गॅस सिलेंडर दरवाढीचा साताऱ्यात निषेध
राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चुलीवर भाजल्या भाकरी
केंद्र शासनाने घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात केलेल्या वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज सातारा येथील भाजी मंडईत चुलीवर भाकरी भाजून, केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध केला.
सातारा : केंद्र शासनाने घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात केलेल्या वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज सातारा येथील भाजी मंडईत चुलीवर भाकरी भाजून, केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध केला.
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये ५०, तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये आज ३५० रुपये दरवाढ करण्यात आल्याने त्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत असताना आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी सातारा येथील पोवई नाक्यावर असणाऱ्या भाजी मंडईत दाखल झाल्या. त्यांनी चुल पेटवून त्यावर भाकरी भाजत केंद्र शासनाचा निषेध केला. सिलेंडरच्या दरात वाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, या सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय, महिलांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी महिला पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, आज सर्वसामान्य नागरिक अनेक हालअपेष्टा सहन करत आपले जीवन जगत आहे. सातत्याने महागाई वाढत आहे. किराणा, भाजीपाला या दरात एकीकडे वाढ होत असताना दुसरीकडे विजेच्या दरातही भरमसाठ वाढ केली आहे. केंद्र सरकार गरिबी नव्हे गरिबांनाच हटवायला निघाले आहे. केंद्र सरकारने तात्काळ घरगुती व व्यावसायिक सिलेंडरच्या दरात घट न केल्यास समस्त महिला रस्त्यावर उतरून चुली पेटवून आंदोलन आणखीन तीव्र करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.


