maharashtra

साताऱ्यात ५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला


येथील जिल्हा परिषद मैदानावर दि. १४ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या सत्संग कार्यक्रमातून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख ९१ हजार ५०० रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याच्या तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सातारा : येथील जिल्हा परिषद मैदानावर दि. १४ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या सत्संग कार्यक्रमातून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख ९१ हजार ५०० रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याच्या तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून सातारा येथील जिल्हा परिषद मैदानावर सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी सौ. कविता सागर मोहिते, रा. दत्तनगर, मुधोजी कॉलेज रोड, फलटण, ता. फलटण व इतर महिला आल्या होत्या. त्यावेळी कुमकुम किसन जाटप, मंजू अजय जाटप, दोघेही रा. नाशिक, जि. नाशिक, अनिता अजय माळी, रा. पुणे, रेखा बला जाटप, बिरपती पोपटसिंग जाटप, तन्नुकुमारी सुरेश, रेणूकुमारी चौधी सर्व रा. मालेगाव, जि नाशिक यांनी कविता मोहिते यांच्यासह इतर महिलांचे एकूण ५ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १ हजार ५०० रुपये किमतीचा एक मोबाइल असा एकूण ५ लाख २१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार कविता मोहिते यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत संबंधित सात जणांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत त्याच दिवशी कल्याणी वसंत माने, रा. कामाठीपुरा, गोडोली, सातारा रेखा जावीर या दोन महिला सत्संग पाहण्यासाठी जिल्हा परिषद मैदानावर आल्या होत्या. त्या सत्संग पाहत असताना सायंकाळी ६ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्या दोन्ही महिलांचे ७० हजार रुपये किमतीची सोन्याची माळ व एक चेन चोरून नेल्याची तक्रार कल्याणी माने यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.