कराड नगरपालिकेकडून 'त्या' कामाला स्थगिती
मृत मुलगा पाण्यात दगड मारताना पाय घसरून पडल्याचे सीसीटीव्हीत उघड
बुधवार पेठेतील नगरपालिकेने खोदलेल्या खड्डय़ातील पाण्यात बुडून विराट विजय चव्हाण या चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर येथील 'त्या' कामाला नगरपालिकेने स्थगिती दिली आहे.
कराड : येथील बुधवार पेठेतील नगरपालिकेने खोदलेल्या खड्डय़ातील पाण्यात बुडून विराट विजय चव्हाण या चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर येथील 'त्या' कामाला नगरपालिकेने स्थगिती दिली आहे.
नगरपालिका व पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता विराट त्या खड्डय़ात साचलेल्या पाण्यात दगड मारताना पाय घसरून पडल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. त्यामुळे या अपघाताची उकल झाली आहे. त्याचबरोबर ठेकेदारांनी नळ कनेक्शन तोडून नुकसान
केल्याप्रकरणी नगरपालिकेने ठेकेदारांविरोधात तक्रार दाखल केल्याने ठेकेदारांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील म्युरल्स बनविण्याचे काम नगरपालिकेने प्रस्तावित केले होते. या कामाचा ठेका सत्यजितसिंह जगताप रा.वडगाव हवेली यांना दिली होता. त्यांच्या अखत्यारित समीर पटवेकर व खाजा मडकी हे दोन उपठेकेदार काम करत होते. संरक्षक भिंतीसाठी सात फुटापेक्षा जास्त उंचीचे खड्डे काढले होते. खोदकामावेळी पाणी पुरवठ्याचे कनेक्शन तुटले होते. त्यामुळे खड्डय़ांत पाणी साचले होते. गटरचे पाणीही साचले होते.
त्यात विराट चव्हाण हा मुलगा सायंकाळी अन्य मुलांसमवेत खेळत असताना तो त्यात पडून बुडाल्याने मृत झाला. त्यावेळी विराटची आई रेश्मा चव्हाण यांच्या फिर्यादीवरून तीन ठेकेदारांवर गुन्हा दाखल केला. त्या घटनेची उकल सीसीटिव्ही फुटेजने केली.
पालिकेच्या शाळा क्रमांक 10 लगत संरक्षक भिंत व त्यावर म्युरल्स रेखाटण्याचे प्रस्तावित केलेले काम अपघातानंतर पालिकेने त्वरीत स्थगीत केले आहे. तेथील खड्डही भरला आहे. तुर्तास हे काम बंद करण्यात आले आहे. येथील खड्डेही भरून घेण्यात आले आहेत. पालिकेने पोलिसांत संबंधित
ठेकेदारांवर खोदकाम करताना नगरपालिकेची पाण्याची पाईप फोडून नुकसान केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे


