maharashtra

अज्ञात वाहनाच्या धडकेत मुख्याध्यापक जागीच ठार; एकजण गंभीर


The headmaster was killed on the spot in an unidentified vehicle collision; One serious
मार्निंग वॉकला निघालेल्या दोघांना अज्ञात चारचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली असून अनिल दरेकर असे जागीच ठार झालेल्याचे नाव आहे.

सातारा : मार्निंग वॉकला निघालेल्या दोघांना अज्ञात चारचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली असून अनिल दरेकर असे जागीच ठार झालेल्याचे नाव आहे.
ते सातारा तालुक्यातील म्हसवे येथील शाळेत मुख्याध्यापक होते. त्यांच्यासोबत मॉर्निंग वॉक करणारे दशरथ फरांदे जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, अनिल दरेकर (वय ५३, रा. भिवडी, ता. जावळी, जि. सातारा) हे सातारा जिल्हा परिषदेच्या म्हसवे येथील शाळेत मुख्याध्यापक आहेत. ते दररोज मॉर्निंग वॉकला जातात. शुक्रवारी सकाळी त्यांच्यासमवेत दशरथ फरांदे (सध्या रा. सैदापूर, ता. सातारा. मूळ गाव फरांदवाडी, ता. फलटण) मॉर्निंग वॉक करत होते. सैदापूर येथे आले असताना त्यांना मागून आलेल्या एका भरधाव चारचाकीने त्यांना धडक दिली. धडक इतकी जोराची होती की दरेकर यांचा जागीचा मृत्यू झाला, तर दशरथ फरांदे जखमी झाले. दरम्यान, चारचाकी वेगाने पुढे निघून गेल्यामुळे ती कोणाची अथवा कोणत्या ठिकाणावरील आहे, याची माहिती उपलब्ध झाली नव्हती.
अपघाताची माहिती मिळताच येथे अनेकांनी गर्दी केली होती. याची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केल्यानंतर मुख्याध्यापक अनिल दरेकर यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. जखमी फरांदे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, या अपघातप्रकरणी मनोज परशुराम इंगवले (रा. किडगाव, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.