जिल्ह्यातील काही खासगी संस्थांमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार प्राप्त होताच संबंधित खासगी संस्थेच्या संचालक मंडळासह जिल्हा निबंधक मनोहर माळी यांची चौकशी करण्याचे आदेश आपण दिले असल्याची माहिती सहकार व इतर बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा : जिल्ह्यातील काही खासगी संस्थांमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार प्राप्त होताच संबंधित खासगी संस्थेच्या संचालक मंडळासह जिल्हा निबंधक मनोहर माळी यांची चौकशी करण्याचे आदेश आपण दिले असल्याची माहिती सहकार व इतर बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील ओबीसी मुली व मुलांसाठी सातारा येथे वस्तीगृह बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे काम कौतुकास्पद असल्याची पोहोच पावतीही त्यांनी यावेळी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहमध्ये झालेल्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम यावेळी उपस्थित होते.
ना. अतुल सावे पुढे म्हणाले, आज जिल्ह्यातील सहकार क्षेत्र व ओबीसी संदर्भात विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. हा आढावा घेत असताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील काही खासगी संस्थांमध्ये गैरव्यवहार झाला असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर संबंधित विभागाच्या प्रमुखांना कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी कराड जनता अर्बन बँकेच्या संचालकांवर गुन्हे दाखल होऊनही त्यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई होत नाही, ही बाब दाखवून दिल्यानंतर संबंधित बँकेच्या सर्व संचालकांसह जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांची ही चौकशी करण्यात येणार आहे. यासंदर्भात कोणाचीही गय केली जाणार नाही, असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये शेती पीक कर्ज वाटप, त्याची रिकव्हरी अत्यंत चांगली आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजनेत जिल्ह्यातील ३ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना प्रति ५० हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई मिळाली आहे. अत्यंत कमी शेतकऱ्यांना नावात चुका, थम इम्प्रेशन यासारख्या तांत्रिक कारणाने नुकसान भरपाई मिळाली नाही मात्र चुकांमध्ये दुरुस्त करून त्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळवून द्यावा अशा सूचना आपण केल्या आहेत. पंजाबराव देशमुख योजनेत राष्ट्रीयकृत बँकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करून ना. अतुल सावे पुढे म्हणाले, काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथे झालेल्या सहकार परिषदेमध्ये केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी येत्या तीन ते साडेतीन वर्षात देशातील सर्व सहकारी संस्था संगणीकृत कराव्यात अशा सूचना केल्या आहेत. सहकार क्षेत्रावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचा मानस आहे. सातारा जिल्ह्यातील ज्या बँका, पतसंस्था अडचणीत आहेत. त्यासंदर्भात संबंधित प्रशासक व डीडीआर त्यांना बैठका घेऊन संबंधित ठेवीदारांच्या ठेवी परत कशा देता येतील यावर अधिक लक्ष करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे अशी पोचपावती त्यांनी यावेळी दिली.
ते पुढे म्हणाले, आजच्या आढावा बैठकीत ज्या आश्रम शाळा व्यवस्थित चालत नाहीत, त्या संदर्भात शासनाने दिलेल्या सवलती त्यांना मिळतात काही नाहीत, याची खातरजमा करण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचित करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील १०० ओबीसी मुली व १०० मुले यांच्यासाठी वस्तीगृह बांधण्याचे निश्चित करण्यात आले असून त्यासाठी जिल्हाधिकारी ऋचेश जयवंशी त्यांनी जागा सुचवली आहे. या वस्तीगृहासाठी मुलींसाठी ६० तर मुलांसाठी ४० टक्के अनुदान केंद्र सरकारकडून प्राप्त होते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्वारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सातारचे भाजपाचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे ही बाब ना. अतुल सावे यांच्या निदर्शनास आणून देताच खा. उदयनराजे भोसले यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचवल्या असल्याचे सांगितले.


