किसन वीर सातारा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत आज अंदाजे ६८ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली. विद्यमान अध्यक्ष मदन भोसले आणि आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. कोणाच्या बाजूने सभासद कौल देणार हे गुरुवारी (दि ५) स्पष्ट होणार आहे.
सातारा : किसन वीर सातारा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत आज अंदाजे ६८ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली. विद्यमान अध्यक्ष मदन भोसले आणि आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. कोणाच्या बाजूने सभासद कौल देणार हे गुरुवारी (दि ५) स्पष्ट होणार आहे.
कारखान्याच्या संचालक मंडळातील २१ जागांसाठी आज मतदान झाले. यासाठी ४६ उमेदवार रिंगणात आहेत. कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ शेतकरी विकास पँनेल व आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी किसनवीर कारखाना बचाव शेतकरी पँनेल यांच्यात लढत झाली. या निवडणुकीच्या प्रचारात कोरेगावचे आमदार महेश शिंदे व आमदार शशिकांत शिंदे यांनी सक्रिय भाग घेतल्याने चुरस वाढली आहे. या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले,विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीही भूमिका निर्णायक राहणार आहे.
वाई, खंडाळा, जावली, सातारा, कोरेगाव,महाबळेश्वर अशा पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याचे ५१ हजार ७१६ ऊस उत्पादक व ३७४ संस्था सभासद असे एकूण ५२ हजार ९० मतदार आहेत. आज सकाळी ८ वाजल्यापासून वाई (६५),जावली (१०),खंडाळा (१३), सातारा (२८),कोरेगाव (३७) व महाबळेश्वर (१) अशा १५४ मतदान केंद्रावर मतदानास सुरुवात झाली. तालुक्यातील मतदान केंद्रावर सकाळपासून मतदानासाठी उत्साह दिसत होता. उमेदवार असलेल्या गावांतील कार्यकर्त्याच्या उत्साहामुळे मतदान केंद्रांवर गर्दी दिसत होती. प्रत्येक मतदारास ऊस उत्पादक सभासद मतदार संघासाठीच्या पाच, व महिला, इतर मागास, भटक्या विमुक्त जाती जमाती वर्ग, अनुसूचित जाती जमाती या राखीव मतदार संघासाठीच्या अशा नऊ मतपत्रिका देण्यात येत होत्या. चार वाजेपर्यंत ६२.८४ टक्के मतदान झाले. यावेळी ३२,४३२ व्यक्तिगत व ३०१ संस्था मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अक्षय तृतीया सणामुळे सकाळी संथ गतीने मतदान सुरू होते. कोठेही रांगा दिसत नव्हत्या. दुपारी उन्हाच्या तडाख्यामुळे मतदानाचा जोर कमी होतं. नंतर अखेरच्या टप्प्यात मतदानाचा वेग वाढला.
भुईज (७० )टक्के , कवठे (७७ ), बावधन (७८), वाईत सिद्धनाथवाडीत (७८.९९ ), द्रविड हायस्कूल केंद्रावर (७८), रविवार पेठ (६५)टक्के झाले. यावेळी किरकोळ वाद वगळता कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. मतदान शांततेत पार पडले.
गुरवारी (दि ५) श्रीनिवास मंगल कार्यालय औद्योगिक वसाहत वाई येथे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी व सहाय्यक निवडणूक अधिकारी सहाय्यक निबंधक गणपत खामकर यांनी दिली. पोलिस उपअधिक्षक डॉ. शीतल जानवे- खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे, भुईंजचे सहाय्यक पोलिस निरिक्षक आशिष कांबळे व त्यांच्या सहकार्यानी बंदोबस्त चोख ठेवला.


