सातारा जिल्ह्यामध्ये मंगळवारी विजयादशमी दसरा सण साजरा होत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये सध्या खरेदीची लगबग सुरू असून दसरा निमित्त वेगवेगळ्या योजनांमध्ये ऑफर जाहीर झाल्या असून वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी तसेच गृहप्रकल्प व्यवसायामध्ये तेजीचे वातावरण आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये मंगळवारी विजयादशमी दसरा सण साजरा होत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये सध्या खरेदीची लगबग सुरू असून दसरा निमित्त वेगवेगळ्या योजनांमध्ये ऑफर जाहीर झाल्या असून वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी तसेच गृहप्रकल्प व्यवसायामध्ये तेजीचे वातावरण आहे. याशिवाय सोमवारी झेंडूसह विविध फुले बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आली. खरेदीसाठी महिला व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवाय शाही दसरा साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनानेही जोरदार तयारी केली असून राजवाडा ते पोवई नाका अशी शाही मिरवणूक काढण्यात येणार आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त साताऱ्याची बाजारपेठ सजली आहे. रविवारी दिवसभर शहर परिसरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. सोमवारी राजवाडा परिसर पोवई नाका भूविकास बँक चौक येथे झेंडूची फुले विकण्यासाठी व्यापाऱ्यांची लगबग सुरू होती. सुमारे 60 ते 80 रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची विक्री झाली. या फुलांना ग्राहकांमधून चांगली मागणी असल्याची शेतकऱ्याने सांगितले. पोवई नाका, मोती चौक, राजवाडा, खण आळी, गोलबाग, राजवाडा सदाशिव पेठ, एसटी स्टँड परिसर, शाहूपुरी, गोडोली, बॉम्बे रेस्टॉरंट, भाजी मंडई परिसर, समर्थ मंदिर येथे दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पिवळा व लाल प्रकारची झेंडूची फुले विक्रीसाठी आली होती.
यंदा बाजारपेठेत तेजीचे वातावरण असून वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी याशिवाय कापड खरेदी, सराफ कट्टा अशा सर्वच क्षेत्रांमध्ये सध्या तेजीचे वातावरण आहे. साताऱ्यामध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन गृहप्रकल्प दिमाखात सादर होत असून यावर आकर्षक योजना जाहीर केल्या जात आहेत. दसऱ्यानिमित्त वाहन क्षेत्रांमध्ये काही अधिकृत विक्रेत्यांनी एकावेळी 50 ते 60 गाड्यांच्या वितरणाची सोहळे ठेवले असून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वाहनांचे वितरण केले जाणार आहे. नवीन कपडे खरेदी, सोने, वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर या खरेदीसाठी दसरा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने सातारकर सध्या खरेदीच्या मूडमध्ये आहेत. साताऱ्याचा शाही दसरा साजरा करण्यासाठी जलमंदिर मध्ये खासदार उदयनराजे भोसले समर्थकांकडून शाही दसऱ्याची तयारी केली जात आहे.
गांधी मैदानावर या दसऱ्याची मिरवणूक आणि त्याची तयारी दिसून येत होती. विजयादशमीच्या निमित्ताने सायंकाळी साडेपाच वाजता ही मिरवणूक निघणार असून उंट, हत्ती, घोडे, पारंपारिक वेशातील मावळे असे शिवकाळाचे वातावरण दिसून येणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पारंपारिक शस्त्रांचे येथील पोवई नाक्यावर पूजन केले जाणार आहे. या शाही मिरवणुकीची सातारकरांना आवर्जून प्रतीक्षा आहे.


