maharashtra

जिल्ह्यात गावबंदीच्या इशार्‍याने नेतेही धास्तावले

सातारा जिल्ह्यात आंदोलनाची धगं वाढली, मराठा क्रांती मोर्चाला विविध संघटनांचा वाढता पाठिंबा

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेली आरपारची लढाई धारदार झाली आहे. सातारा जिल्ह्यातही या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत असून दिवसेंदिवस सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर बसलेल्या उपोषणकर्त्यांना समाजाच्या विविध स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे.

सातारा : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेली आरपारची लढाई धारदार झाली आहे. सातारा जिल्ह्यातही या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत असून दिवसेंदिवस सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर बसलेल्या उपोषणकर्त्यांना समाजाच्या विविध स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील तब्बल 400 गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आल्याचे फलक झळकले असून ठिकठिकाणी साखळी उपोषणाचे सत्र सुरू झाले आहे. कुठे मुंडन आंदोलन, तर कुठे राजीनामा अशा विविध माध्यमातून हे आंदोलन अधिक धारदार झाल्याने राजकीय नेत्यांची चांगलीच पंचायत झाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे 24 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण पुन्हा सुरू करून राज्य सरकारला एक प्रकारचा अल्टीमेटम दिला आहे. या आंदोलनाची दखल संपूर्ण महाराष्ट्रात तीव्रतेने जाणवत असून सातारा जिल्ह्यातही हे आंदोलनाचा टिपेला पोहोचले आहे. सातारा जिल्ह्यात आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरू असून जिल्ह्यातील सुमारे 400 गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात राजीनामा सत्र सुरू झाले असून कान्हरवाडी, ता. खटाव येथील महिला ग्रामपंचायत सदस्य कोमल प्रवीण जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे. जरांगे पाटील यांच्या दुसर्‍या टप्प्यातील आरपार लढाईमुळे आंदोलनाला गती आली असून सुमारे 400 गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करणारे फलक झळकवण्यात आले आहेत.
सातारा जिल्हा मराठी क्रांती मोर्चा ने आरंभलेल्या एक दिवस समाजासाठी या अभियानाला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सातारा तालुक्यातील 14 गावांनी आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन येथील उपोषणाला पाठिंबा दिला आहे. वाई येथे मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला. फलटण तालुक्यातील आसू गावाने राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा पहिल्यांदा निर्णय घेतला होता. त्यानंतर गावबंदीचे लोण सर्वत्र पसरले. आता सातारा तालुक्यातील 23 गावांमध्ये नेत्यांना इशारा देणारे फलक झळकू लागले आहेत.
सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणात गेल्या दोन दिवसात सातारा तालुक्यातील अंगापूर, चिंचणेर वंदन, निगडी, धनगरवाडी, देगाव, कोडोली, लिंब येथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला. सोमवारी रिपाई संघटनेने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा शहरातून बाईक रॅली काढली. वंचित बहुजन आधाडी व अंगणवाडी सेविका संघटनेने सुध्दा या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयावर नागरिकांनी भजन, कीर्तन, ढोलकी वादन, टाळ मृदुंग इत्यादी विविध उपक्रमाच्या माध्यमातून राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

तात्या सावंत यांची प्रकृती खालावली
सातार्‍याचे 72 वर्षीय जेष्ठ नागरिक तात्या सावंत हे प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत. सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून क्रांती मोर्चा चे सदस्य या जेष्ठ नागरिकांच्या प्रकृतीची काळजी घेत आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाकडून या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या सदस्यांनी सोमवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांना घेराव घातला. युवराज करपे हे जिल्हाधिकारी कार्यालयात जात असताना त्यांना आंदोलन स्थळी नेऊन आंदोलकांनी सावंत यांच्याशी चर्चा करण्याचा भाग पाडले. सावंत यांना रक्तदाब कमी झाल्याने व अशक्तपणा आल्याने सध्या त्यांची प्रकृती खालावली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर करपे यांनी त्यांना औषधे देऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती. मात्र आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय हे उपोषण सुटणार नाही, असा खरमरीत इशारा सावंत यांनी दिला. त्यामुळे आंदोलकांवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य ते उपचार होत नसल्याचे आरोप होत आहेत. जिल्हा प्रशासनाला आरोप फिरते आरोग्य पत्रकाची परिसरात नेमणूक करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.