कर्दे समुद्रात बुडालेल्या पाचगणीतील युवकाचा मृतदेह सापडला
सोळा तासाच्या शोध मोहिमेनंतर आले यश
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कर्दे समुद्रात बुडालेल्या युवकाचा मृतदेह तब्बल 16 तासानंतर शोध मोहिमेत सापडला आहे. स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी रविवारी सायंकाळपासून ही शोध मोहीम सुरू केली होती. अखेर सौरभ प्रकाश घावरे राहणार पाचगणी तालुका महाबळेश्वर याचा मृतदेह हाती लागला आहे.
सातारा : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कर्दे समुद्रात बुडालेल्या युवकाचा मृतदेह तब्बल 16 तासानंतर शोध मोहिमेत सापडला आहे. स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी रविवारी सायंकाळपासून ही शोध मोहीम सुरू केली होती. अखेर सौरभ प्रकाश घावरे राहणार पाचगणी तालुका महाबळेश्वर याचा मृतदेह हाती लागला आहे.
दापोली तालुक्यातील कर्दे बीचवर रविवारी वाई तालुक्यातील सहा जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी स्थानिक मच्छीमारांना सहा पैकी पाच जणांना वाचवण्यात यश मिळाले. मात्र सौरभ घावरे हा समुद्राच्या लाटेबरोबर खोलवर समुद्रात वाहत गेल्याने बेपत्ता झाला होता. त्याचा शोध सर्वांनी घेतला. परंतु अंधार पडल्यानंतर शोध मोहीम थांबवण्यात आली होती. कार्तिक गाडगे, यश घाडगे, दिनेश चव्हाण, अक्षय शेलार, कुणाल घाडगे या पाच जणांना स्थानिकांनी वाचवले. मात्र सौरभ घावरे याचा शोध लागू शकला नव्हता. या घटनेने सर्व मित्रांना मोठा धक्का बसला.
सोमवारी पुन्हा शोध मोहिमेस प्रारंभ झाला. सुमारे दोन तासाच्या प्रयत्नानंतर अखेर सौरभ प्रकाश घावरे यांचा मृतदेह समुद्रकिनाऱ्यावर आढळून आला. सौरभच्या आकस्मिक दुर्दैवी मृत्यूने घावरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


