maharashtra

पोलिसाला जखमी करून पसार झालेल्या सराईतांपैकी एक अटकेत; कराड शहर पोलिसांची कारवाई


Arrest of one of the inmates who passed out after injuring the police
कृष्णा कॅनाॅल (कराड) जवळ इनोव्हा कारमधून पळून जाताना पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत पोलिसाला जखमी करून पसार झालेल्या सराईतांपैकी एकाला पोलिसांनी अटक केली. ओगलेवाडी पोलिसांनी रहिमतपूर येथे ही कारवाई केली.

कराड : कृष्णा कॅनाॅल (कराड) जवळ इनोव्हा कारमधून पळून जाताना पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत पोलिसाला जखमी करून पसार झालेल्या सराईतांपैकी एकाला पोलिसांनी अटक केली. ओगलेवाडी पोलिसांनी रहिमतपूर येथे ही कारवाई केली. त्यानंतर पोलिसांनी संशयिताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावणी आहे.
प्रतीक संजय यादव (वय 21) रा. रहिमतपूर ता. कोरेगाव असे याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कृष्णा कॅनाॅलजवळ (कराड) येथे की, 6 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कारमधून आलेल्या सराईत गुन्हेगारांची सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर झटापट झाली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचारी सराईत गुन्हेगाराला चालू कारमधून बाहेर ओढण्याच्या प्रयत्नात असताना संशयिताने धक्का दिल्याने व दुचाकी घसरल्याने
पोलीस कर्मचारी साबिर मुल्ला हे जमिनीवर पडून जखमी झाले होते. त्यानंतर संशयितांनी तिथून कारसह पलायन करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, विद्यानगरमार्गे मसूरकडे जाताना साई गार्डन हॉटेल समोरील रस्त्यावर कोरोनाच्या अनुषंगाने ओगलेवाडी दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे कारवाई करत होते. याठिकाणी संशयित आल्यावर त्यांना समोर पोलीस दिसताच त्यांनी रस्त्यात मध्येच इनोव्हा कार सोडून तेथून पलायन केले होते. पोलिसांनी इनोव्हा कार ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली. यावेळी पोलिसांना कपडे व न वापरलेले 5 सिमकार्ड मिळून आले.
त्यानंतर पोलिसांनी इनोव्हा कारच्या कागदपत्रावरून मूळ मालकाचा शोध घेतला. तसेच त्याच्याकडून ज्याला गाडी विकली त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचले. तेथून पोलिसांना संशयितांची माहिती मिळाली. तेंव्हापासून पोलिस त्यांच्या शोधत होते. यादरम्यान, पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून रहिमतपूर येथे संशयित येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी रहिमतपूर येथे सापळा लावला. संशयित तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांनी संशयिताला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस हवालदार प्रवीण काटवटे, रवींद्र पवार, सचिन सूर्यवंशी, किशोर तारळकर, विनोद माने, रूपाली डुबल, धीरज कोरडे, माणिक थोरात यांनी ही कारवाई केली.