maharashtra

केंद्रातील चुकीच्या धोरणामुळे देशातील लोकशाही धोक्यात

कॉंग्रेसचे संपर्क नेते सतेज पाटील यांची सातार्‍यात टीका; सातारा जिल्ह्यात 75 किलोमीटरची गौरव पदयात्रा

Democracy in the country is under threat due to the wrong policy of the centre
देशात केंद्र सरकारने जीएसटी आणि इतर सरकारी धोरणांचा चुकीचा वापर केल्याने महागाई प्रचंड वाढली आहे. काही यंत्रणांचा गैरवापर होत असून त्यामुळे येथील लोकशाही धोक्यात आल्याची टीका माजी गृहराज्यमंत्री व कॉंग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सातार्‍यात केली.

सातारा : देशात केंद्र सरकारने जीएसटी आणि इतर सरकारी धोरणांचा चुकीचा वापर केल्याने महागाई प्रचंड वाढली आहे. काही यंत्रणांचा गैरवापर होत असून त्यामुळे येथील लोकशाही धोक्यात आल्याची टीका माजी गृहराज्यमंत्री व कॉंग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सातार्‍यात केली. महाराष्ट्रात मंत्रीमंडळ स्थापन व्हावे यासाठी आम्हालाच राज्यात मोर्चे काढावे लागतील, असा उपरोधिक टोला त्यांनी राज्यातील शिंदे व भाजप युती सरकारला लगाविला.
सातारा जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्ट या दरम्यान राष्ट्रीय कॉंग्रेसने 75 किलोमीटरच्या आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन केले आहे. त्याची माहिती सतेज पाटील यांनी पत्रकारांना दिली.
ते म्हणाले, आझादी गौरव पदयात्रेची सुरवात 9 ऑगस्ट रोजी कोल्हापूर नाका कराड येथून होणार आहे. माण, खटाव, कोरेगाव, सातारा ग्रामीण व शहर फलटण वाई, जावळी, पाटण, कराड दक्षिण व कराड उत्तर, महाबळेश्वर येथे प्रत्येक तालुक्यात किमान पाच ते पंधरा किलोमीटर पदयात्रा होणार असून या पदयात्रेत जनसंवाद व कॉंग्रेसने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात दिलेले योगदान आणि त्यातील लोकशाहीचा विचार लोकांपर्यंत पोहचविला जाणार आहे. प्रत्येक पदयात्रेसाठी जिल्हा कॉंग्रेस कमिटीने तालुका निहाय निरीक्षक नेमलेला आहे.
राष्ट्रीय व राज्य पातळीवर घडणार्‍या घटनांबाबत भाष्य करताना सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, केंद्राने जीएसटी कक्षेत जीवनावश्यक वस्तू आणून महागाई वाढविली आहे. यंत्रणांचा चुकीचा वापर यामुळे येथील लोकशाही धोक्यात आली आहे. म्हणूनच कॉंग्रेसची सातत्याने संघटनात्मक पातळीवर सातत्यान आंदोलने सुरू आहेत. भाजप लोकशाहीचा गळा घोटतेय अन् आपण लोकशाहीचे प्रबोधन करताय या प्रश्नावर ते म्हणाले, आज महागाई आणि जीएसटी मुळे लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून कॉंग्रेस त्याविरूध्द व्यापक जनआंदोलन उभे करत आहे.
पेट्रोल, डिझेल महागाई या विरुद्ध आंदोलन सुरू आहे. महागाई विरुद्ध आज सरकार बोलायला तयार नाही. राज्यात सरकार स्थापन होऊन 35 दिवस झाले. मात्र अद्यापही सरकार स्थापन झालेले नाही. महाराष्ट्रात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, असे पाटील म्हणाले  अशोक चव्हाण हे भाजप च्या वाटेवर आहेत या चर्चांचा इन्कार करताना ते म्हणाले, या अफवा आहेत. याबाबत चव्हाण यांनी खुलासा केला आहे. हे सरकार टीकेल की नाही हे येत्या 8 ऑगस्टला कळेल. राज्यात मंत्रीमंडळ स्थापन व्हावे म्हणून आता कॉंग्रेसला मोर्चे काढावे लागतील. दोघांच्यावर राज्य चालणे हे राज्याच्या हितावह नाही. एक टीम तरी 11 ची करा, असे आम्ही सांगत आहोत. आता मंत्री कोणाला करायचे हा खरा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला गर्दी होत आहे यावर ते म्हणाले, निवडणुका लागल्या की कळेल. कॉंग्रेसने अतिवृष्टीनंतर दौरा हाती घेतला आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.