maharashtra

माजी नगरसेवक विजय काटवटे यांचा आत्मदहनाचा इशारा


सातारा शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील रस्त्याचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे त्याला पावसाळ्यात खड्डे पडल्याने अपघात होऊन अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

सातारा : सातारा शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील रस्त्याचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे त्याला पावसाळ्यात खड्डे पडल्याने अपघात होऊन अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. संबंधित रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने करा, अशी मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे दि. २६ जानेवारीपर्यंत ते काम पूर्ण न झाल्यास २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा भाजपचे माजी नगरसेवक विजय काटवटे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिला.

ते पुढे म्हणाले, चंद्रकांत पाटील हे बांधकाम मंत्री असताना मी त्यांच्याकडून सातारा शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील रस्त्यांच्या कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सातारा येथील नंदकुमार कंट्रक्शन करीत होते. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर रस्त्यावर दोन लेअर मारले गेले मात्र तिसरा सिलकोटचा लेयर न मारल्यामुळे पावसाळ्यामध्ये तो रस्ता वाहून गेला. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले, खडी उखडल्यामुळे सातत्याने वाहनांचे अपघात होऊन अनेकांना दुखापत होण्याच्या घटना घडत आहेत. याबाबत मी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासह सिलकोटचा तिसरा लेअर मारावा या मागणीसाठी मी दि. २० डिसेंबरपासून सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलनास बसणार असून दि. २६ जानेवारी २०२३ पर्यंत हे काम पूर्ण न केल्यास मी त्याच दिवशी म्हणजे दि. २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर आत्मदहन आंदोलन करणार असल्याची माहिती भाजपचे माजी नगरसेवक विजय काटवटे यांनी यावेळी दिली.