बुधवार नाका परिसरातील फर्निचरचे गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी
तब्बल सात लाखाचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी नाही
बुधवार नाका परिसरातील जयेश एंटरप्राइजेस येथील फर्निचरच्या गोडाऊनला शनिवारी वीज पुरवठा करणाऱ्या मीटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन मोठी आग लागली. या आगीमध्ये सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र इलेक्ट्रिक मशीन आणि इतर फर्निचर जळून सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले.
सातारा : बुधवार नाका परिसरातील जयेश एंटरप्राइजेस येथील फर्निचरच्या गोडाऊनला शनिवारी वीज पुरवठा करणाऱ्या मीटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन मोठी आग लागली. या आगीमध्ये सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र इलेक्ट्रिक मशीन आणि इतर फर्निचर जळून सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन अवघ्या पाऊण तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले. गोडाऊन मधून आगेचे मोठे लोळ बाहेर पडू लागल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, बुधवार नाका परिसरात राजेंद्र धर्मेंद्र शर्मा वय 29 राहणार मोळाचा ओढा सातारा यांनी हे गोडाऊन भाड्याने घेतले आहे. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे फर्निचरच्या गोडाऊनमध्ये काम सुरू होते. गोडाऊन मध्ये चार ते पाच कर्मचारी कामावर होते. अचानक गोडाऊनला वीज पुरवठा करणाऱ्या मीटर मधून मोठा जाळ होऊन एकदम आगीचा भडका उडाला. सर्व कामगार शिताफिने तात्काळ गोडाऊनच्या बाहेर पडले. मात्र आतील इलेक्ट्रिक मशीन आणि फर्निचर चे इतर साहित्य याने तातडीने पेट घेतला आणि आग संपूर्ण गोडाऊनमध्ये पसरत गेली. त्यामुळे संपूर्ण गोडाऊनमध्ये आगीच्या ज्वाला दिसू लागल्या.
आग भडकल्याने नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. आगीचे वृत्त कळताच शाहूपुरी पोलीसही तेथे घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाने तातडीने पाण्याचा मारा सुरू करून आग आटोक्यात आणली. मात्र तत्पूर्वी गोडाऊन मधील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडून सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीची दाहकता इतकी होती की लगतच्या सिमेंटच्या गोडाऊनला सुद्धा आगीची झळ बसली. हे गोडाऊन सरकारी वकील महेश कुलकर्णी यांच्या मालकीचे आहे. त्याचेही या आगीमध्ये थोडेफार नुकसान झाले. आगीच्या धगीमुळे छप्पर असणाऱ्या पत्र्याला सुद्धा भगदाड पडले. सदर गोडाऊन हे रहिवासी क्षेत्रांमध्येच होते. आजूबाजूला दाट लोकवस्ती होती. मात्र अग्निशमन दलाने आग तातडीने आटोक्यात आणल्याने फार प्रचंड वित्तहानी झाली नाही. शाहूपुरी पोलिसांनी शाहूपुरी पोलीस स्टेशन कडे जाणारी वाहतूक काही काळ थांबवली होती. राजेंद्र शर्मा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची खबर दिली आहे. हवालदार एस. एस. भिंगारदिवे अधिक तपास करत आहेत.


