ऑन्को लाईफ कॅन्सर हॉस्पिटल मधील डॉक्टरांकडून चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याचा आरोप
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा आशिष जाधव यांचा इशारा
शेंद्रे, ता. सातारा येथील ऑन्को लाईफ कॅन्सर हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी जर्मसेल ट्युमर या माझ्या कॅन्सरच्या आजारावर चुकीच्या पद्धतीने उपचार करून माझ्याकडून १२ लाख रुपये उकळले आहेत. आता यापुढील उपचार आपल्या देशामध्ये होऊ शकत नाही. तो परदेशातच करावा लागेल.
सातारा : शेंद्रे, ता. सातारा येथील ऑन्को लाईफ कॅन्सर हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी जर्मसेल ट्युमर या माझ्या कॅन्सरच्या आजारावर चुकीच्या पद्धतीने उपचार करून माझ्याकडून १२ लाख रुपये उकळले आहेत. आता यापुढील उपचार आपल्या देशामध्ये होऊ शकत नाही. तो परदेशातच करावा लागेल. त्यासाठी हॉस्पिटल व्यवस्थापनाने पुढाकार घेऊन माझ्यावर उपचार करावेत. अन्यथा दि. २६ जानेवारी रोजी मी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा आशिष पोपट जाधव, रा. अतित, ता. सातारा यांनी पत्रकार परिषदेत दिला.
आशिष जाधव पुढे म्हणाले, मला जेवण जात नसल्यामुळे अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे दि. २४ ऑगस्ट २०१८ रोजी मी शेंद्रे येथील ऑन्को लाईफ कॅन्सर हॉस्पिटलमध्ये माझी प्रकृती दाखवण्यासाठी गेलो. त्यानंतर माझ्या पोटाचे स्कॅनिंग केल्यानंतर तेथील डॉ. पुष्पलता मोतलिंग, डॉ. करण चंचलानी यांनी कॅन्सरचे निदान करून मला तात्काळ उपचार करून घेण्याच्या सूचना करत योग्य वेळी उपचार न केल्यास जीवाला धोका निर्माण होईल, अशी भीती घातली. संबंधितांनी डॉ. उदय देशमुख, मनोज लोखंडे, प्रताप राजेमहाडिक, सचिन देशमुख या डॉक्टरांशी माझे बोलणे करून दिले. त्यांनीही मला जर्मसेल ट्युमर प्रकाराचा कॅन्सर झाला असल्याचे सांगून त्यासाठी रेडिएशन देण्याशिवाय व त्यानंतर ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. याबाबत माझा लवकर निर्णय होत नसल्याचे पाहून त्यांनी उपचार, चाचण्या व औषधांचा खर्च महात्मा फुले योजनेतून मिळणार आहे. त्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत, असे मला सांगितले गेले.
आशिष जाधव पुढे म्हणाले, दि. २४ ऑगस्ट ते दि. २ मे २०१८ अशी दहा दिवस माझ्यावर रेडिएशन उपचार करण्यात आले. उपचारापूर्वी मला मणक्याचा कोणताही आजार नव्हता. दि. ३ सप्टेंबर २०१८ रोजी माझे कॅन्सरचे ऑपरेशन झाले. त्याबाबत होणारा खर्च महात्मा फुले योजनेतून मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांवर माझ्या सह्या घेण्यात आल्या. प्रत्यक्षात मात्र ही औषधे योजनेत बसत नाहीत. काही औषधे मर्यादित व सुमार दर्जाची असतात असे सांगून वेळोवेळी माझ्याकडून १२ लाख रुपये हॉस्पिटल प्रशासनाने उकळले आहेत. दि. १३ सप्टेंबर २०१८ पर्यंत माझ्यावर १२ केमो थेरपी केल्या. माझ्या शरीरातून १०९ कॅन्सरच्या गाठी नाहीशा झाल्या. काही गाठींचा आकार कमी झाला असेल मला सांगून मला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर काही काळातच माझ्या दोन्ही पायातील ताकद कमी होत असल्याची मला जाणीव झाली. याबाबत मी एमआयआर केला असता रेडिएशनमुळे माझ्या दोन्ही पायातील ताकद गेली असल्याचे डॉक्टरांनी मला सांगितले. आता माझ्यावर भारतामध्ये उपचार होऊ शकत नाहीत, असे सांगून ते पुढे म्हणाले, डॉ. पुष्पलता मोतलिंग, डॉ. करण चंचलानी यांनी कोणतीही गरज नसताना व उपचार पद्धतीतील नमूद व प्रचलित उपचार पद्धती नसताना मला रेडिएशन देऊन माझ्या रक्तवाहिन्या जाळून मला ७२ टक्के कायमचे अपंग केले आहे. हॉस्पिटलमधील माझ्यावर उपचार करणाऱ्या सर्वच डॉक्टरांच्या विरोधात मी बोरगाव पोलीस ठाणे व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली असून माझ्यावर परदेशात उपचार करण्याची व्यवस्था संबंधित हॉस्पिटलने करावी, अशी माझी मागणी आहे. मी केलेल्या तक्रारीनुसार संबंधित डॉक्टरांवर कारवाई न झाल्यास दि. २६ जानेवारी रोजी सातारा येथे आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.


