महिलेची फसवणूक करणार्या परप्रांतीय युवकास अटक
हातचलाखीने सोने काढून घेतल्याचा गुन्हा होता दाखल
सोने- चांदी पॉलिश करून देतो असे सांगून त्यातील सोने हातचलाखीने काढून घेऊन फसवणूक करणार्या परप्रांतीय युवकास जेरबंद करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. राहुल अजयकुमार साह, वय २०, रा. समेली, ठाकूरवाडी टोला, कुरसेना, बिहार असे अटक केलेल्या परप्रांतीय युवकाचे नाव आहे.
सातारा : सोने- चांदी पॉलिश करून देतो असे सांगून त्यातील सोने हातचलाखीने काढून घेऊन फसवणूक करणार्या परप्रांतीय युवकास जेरबंद करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. राहुल अजयकुमार साह, वय २०, रा. समेली, ठाकूरवाडी टोला, कुरसेना, बिहार असे अटक केलेल्या परप्रांतीय युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विद्यानगर, कोडोली, ता. सातारा येथे दोन अनोळखी इसमांनी तेथे वास्तव्यास असलेल्या एका महिलेला सोने-चांदी पॉलिश करून देतो असे सांगून त्यांच्याकडून पितळ आणि चांदीची भांडी घेतली. ती भांडी एका विशिष्ट द्रव्याने पॉलिश करून दिली. यावेळी त्या इसमांनी त्या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्या महिलेकडुन सोन्याच्या बांगड्या पॉलिश करण्यासाठी मागून घेतल्या. बांगड्या पॉलिश केल्यानंतर एका कागदात गुंडाळून ठेवुन काही वेळानंतर कागद उघडण्यास सांगून ते निघून गेले. दरम्यान काही वेळाने त्या बांगड्या संबंधित महिलेने कागदातून बाहेर काढल्या असता त्यावर लाल रंगाचे आवरण दिसून आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याबाबत त्यांनी संबंधित इसमांच्या विरोधात फसवणूक केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी दोन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. सातारा शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तपास करत असताना या फसवणूक प्रकरणातील एक परप्रांतीय युवक सातारा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्याने तपास केला असता त्याने फसवणूक केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडे केमिकल्स सदृश्य द्रव्य आढळून आले. संबंधित युवकाला अटक करण्यात आली आहे.


