maharashtra

शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी वडूजचे नवनाथ जाधव

व्हाईस चेअरमनपदी फलटणचे शशिकांत सोनवलकर; मायणीचे शहाजी खाडेही सभासद परिवर्तन पॅनलच्या पाठीशी

येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या पदाधिकारीपदी सभासद परिवर्तन पॅनलच्या संचालकांना संधी मिळाली असून चेअरमनपदी नवनाथ जाधव यांची, तर व्हाईस चेअरमनपदी शशिकांत सोनवलकर यांची निवड करण्यात आली आहे. 18 विरुद्ध 3 अशा मताधिक्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या.

सातारा : येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या पदाधिकारीपदी सभासद परिवर्तन पॅनलच्या संचालकांना संधी मिळाली असून चेअरमनपदी नवनाथ जाधव यांची, तर व्हाईस चेअरमनपदी शशिकांत सोनवलकर यांची निवड करण्यात आली आहे. 18 विरुद्ध 3 अशा मताधिक्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या.
गेल्या महिन्यात झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सभासद परिवर्तन पॅनलने 21 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या तर निवडीनंतर मायणी गटातून निवडून आलेले शहाजी खाडे हेसुद्धा सभासद परिवर्तन पॅनल मध्ये सहभागी झाले, त्यामुळे सभासद परिवर्तन पॅनेलची बाजू आणखी भक्कम झाली.
चेअरमनपदासाठी पॅनेलच्यावतीने खटाव गटातील संचालक नवनाथ सदाशिव जाधव, तर व्हाईस चेअरमन पदासाठी फलटण गटातून निवडून आलेले संचालक शशिकांत सोनवलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर विरोधकांतर्फे चेअरमन, व्हाईस चेअरमन पदासाठी अनुक्रमे महेंद्र जानुगडे व विजय शिर्के यांनी अर्ज दाखल केले होते.
18 विरुद्ध 3 अशा मताधिक्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या व विरोधकांना धोबीपछाड करीत सभासद परिवर्तन पॅनलने बँकेवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
निवडीनंतर पॅनलचे प्रमुख व नूतन पदाधिकारी आणि संचालकांची फटाक्यांची आतषबाजी व हलगीच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. तसेच पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण तसेच नगरपालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मिरवणूक पुन्हा बँकेत आली.  तेथे झालेल्या सभेत नूतन पदाधिकारी व संचालकांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी उदय शिंदे, बलवंत पाटील, दीपक भुजबळ, चंद्रकांत यादव आदींची भाषणे झाली. विश्वंभर रणनवरे यांनी प्रास्ताविक केले. सुभाष ढालपे यांनी आभार मानले.

वचने पूर्ण करून सभासदांचा विश्वास वाढवणार
संभाजीराव थोरात, उदय शिंदे, बलवंत पाटील यांची ग्वाही
शिक्षक बँकेत सभासद परिवर्तन पॅनलने सत्ताबदल केला. चेअरमनपदी नवनाथ जाधव व व्हा. चेअरमनपदी शशिकांत सोनवलकर यांची निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना संभाजीराव थोरात, उदय शिंदे, बलवंत पाटील यांनी सभासदांना दिलेली वचने पूर्ण करून सर्वांचा विश्वास वाढवणार असल्याचे सांगितले.
गेल्या चार वर्षात संस्थेचा कारभार चुकीच्या पद्धतीने झाला व त्याचा फटका बँकेला पर्यायाने सभासदांना बसला. अनावश्यक खर्चात भरमसाठ वाढ झाली. हा अनागोंदी कारभार सभासदांपासून लपला नाही. या कामकाजात बदल झाला पाहिजे, या हेतूने सभासद परिवर्तन पॅनल सभासदांना सामोरे गेले. सर्वांना आमची भूमिका पटवून सांगितली. भविष्यातील योजना त्यांच्यासमोर मांडल्या, असे सांगून उदय शिंदे म्हणाले, आमची एकत्रित भूमिका सभासदांना भावली व त्यांना खात्री पटली व त्यामुळेच आम्हाला भरभरून पाठबळ मिळाले. नवीन चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालकांच्या माध्यमातून संस्था आर्थिक दृष्ट्या चांगली कशी चालेल, याकडे लक्ष दिले जाईल. सभासदांना अधिकाधिक सुविधा दिल्या जातील. कर्ज व्याजदरात घट, सेवानिवृत्तांसाठी मतदारसंघ निर्माण करणे, महिलांसाठी शाखांमध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करणे याला प्राधान्य दिले जाईल. कामकाज करताना विधायक दृष्टिकोन ठेवला जाईल, जेणेकरून पुढच्या पाच वर्षात तक्रारीला जागा राहणार नाही.
संभाजीराव थोरात म्हणाले, गतकाळातील गचाळ कारभार, आमची भूमिका व प्रामाणिकपणा सभासदांना पटल्यामुळे विश्वास वाढून परिवर्तन घडले. या विश्वासास पात्र राहून कारभार होईल.
बलवंत पाटील म्हणाले, बँकेत सत्वर सेवेला प्राधान्य दिले जाईल. कारभारातील काटकसरीच्या  धोरणानुसार यापुढे नोकर भरती न करण्याच्या भूमिकेवर परिवर्तन पॕनेल ठाम असेल. एटीएम सेवा व नेट बँकिंग बाबत लवकरच पावले उचलली जातील. कर्जावरील व्याजाच्या उत्पन्नाशिवाय आणखी काय करता येईल, सभासदांच्या पाल्यांसाठी कोणते प्रकल्प उभारता येतील यावर विचार विनिमय करण्यात येणार आहे. विरोधी सभासद पॅनलचे शहाजी खाडे यांनी परिवर्तन पॕनेलला स्वतःहून पाठिंबा दिल्याचे बलवंत  पाटील म्हणाले.

शहाजी खाडे यांचा परिवर्तनला पाठिंबा
सभासद विकास पॅनल मधून मायणी गटातून निवडून आलेले शहाजी खाडे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीपूर्वीच संभाजीराव थोरात, उदय शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून परिवर्तन पॕनेलला पाठिंबा जाहीर केला. बँकेत ते आपल्याच गाडीतून आल्याचे बलवंत पाटील यांनी सांगितले. निवडणुकीत १७ - ४ असा विजय मिळवलेल्या परिवर्तन पॅनलचीआघाडी आता खाडे यांच्या पाठिंबामुळे १८ - ३ अशी वाढली आहे. बँकेच्या चांगल्या कारभाराच्या दृष्टीने हा शुभसंकेत असल्याचे बलवंत पाटील म्हणाले.

पूर्वीच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढणार
निवडणुकीत आम्ही सत्ताधारी पॅनलवर जे आरोप केले त्यात तथ्यांश आहेच. मागच्या चुकीच्या कारभाराची कायद्याच्या चौकटीत राहून चौकशी केली जाईल, असे उदय शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर याबाबत श्वेतपत्रिकाही काढली जाईल, तथापि हे आम्ही जाणीवपूर्वक किंवा आकसाने करणार नसून सभासदांना दिलेल्या वचनाप्रमाणे वस्तुस्थिती पुढे आणणार असल्याचे उदय शिंदे व बलवंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.