maharashtra

साताऱ्यात आदर्श शिक्षण संस्था स्पर्धेचे आयोजन

सातारा जिल्हा शिक्षण संस्था संचालक संघटनेचे अध्यक्ष अशोकराव थोरात यांची माहिती

सातारा जिल्हा शिक्षण संस्था संचालक यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये आदर्श शिक्षण संस्था स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शिक्षण संस्थांच्या कामकाजाची माहिती घेऊन परीक्षण आणि निरीक्षणाद्वारे आदर्श शिक्षण संस्थेची निवड केली जाणार आहे.

सातारा : सातारा जिल्हा शिक्षण संस्था संचालक यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये आदर्श शिक्षण संस्था स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शिक्षण संस्थांच्या कामकाजाची माहिती घेऊन परीक्षण आणि निरीक्षणाद्वारे आदर्श शिक्षण संस्थेची निवड केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात आली आहे. शहरी भागातून पाच, उर्वरित ग्रामीण भागातून पाच अशा दहा शिक्षण संस्था निवडल्या जाणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अशोकराव थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली,
यावेळी संस्थेचे सचिव एस.टी. सुक्रे व सहसचिव डी. के. जाधव उपस्थित होते. येथील शासकीय विश्रामगृहात थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, या स्पर्धेच्या पाठीमागे खाजगी शिक्षण संस्थांचा कार्यभार आणि त्यांची गुणवत्ता सुधारणे हा या स्पर्धा मागील प्रामाणिक हेतू आहे. या संस्थांचे कामकाज कशा पद्धतीने चालते याकरिता विशिष्ट समितीद्वारे शहरी भागातील पाच आणि ग्रामीण भागातील पाच अशा संस्थांची निवड करून त्यांना ट्रॉफी सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. सर्व शिक्षण संस्थांना या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन थोरात यांनी यावेळी केले. या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. फक्त नोंदणी मात्र अनिवार्य आहे. प्रत्यक्ष संस्थेला पोस्टाद्वारे पत्रक नोंदणी फॉर्म अटी कळवल्या जाणार आहेत.
एकूणच केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणा संदर्भात बोलताना थोरात म्हणाले, एकूण सकल उत्पन्नाच्या सहा ते सात टक्के पर्यंत केंद्र शासन शिक्षण प्रक्रियेवर खर्च करते. मात्र प्रत्यक्षात तो खर्च केवळ तीन ते पाच टक्केच होतो. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षण संस्था, त्यांचे संचालक, पदाधिकारी यांना अनेक प्रशासकीय आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. महाराष्ट्रातील खाजगी शिक्षण संस्थाकडे बघण्याचा दृष्टिकोन सदोष आहे. परंतु शिक्षण संस्था संघ यांना वेतन इतर अनुदान पुरेशा प्रमाणात आणि वेळेवर प्राप्त होत नाहीत. त्यामुळे शैक्षणिक कामे आणि प्रक्रियेवर बराचसा ताण पडतो. शिक्षण संस्था जरी प्रामाणिकपणे कार्यरत असल्या तरी आपल्यातही काही दोष निर्माण झाले आहेत. शिक्षण संस्था व संचालकांवर टीका करण्याची संधी कधी कधी थोड्या प्रमाणात आपणच देत असतो. शिक्षण संस्थेने आपले कामकाज सुधारले पाहिजे. नियम व कायद्याला धरून काम केले पाहिजे. यासाठी गेल्या 22 वर्षात अनेक कार्यशाळा घेण्यात आल्या. अजूनही शिक्षण संस्था संचालक व प्राचार्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. सातारा जिल्हा शिक्षण संस्था संचालक संघ आत्मचिंतन पर शिक्षण संस्थांची परिषद आयोजित करणार आहे, असे थोरात यांनी सांगितले.