maharashtra

स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या गांजा तस्करांच्या मुसक्या

दोघांवर गुन्हा; सुमारे 9 लाख 84 हजार 680 रुपयांचा ऐवज जप्त

Smuggling of cannabis smugglers caught by the local crime branch
माण तालुक्यातील मोगराळे घाटात स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून गांजाची तस्करी करणार्‍या दोघांना पकडले. त्यांच्याकडून 1 लाख 61 हजारांचा गांजा आणि कार, मोबाइल असा सुमारे 9 लाख 84 हजार 680 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

माण : माण तालुक्यातील मोगराळे घाटात स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून गांजाची तस्करी करणार्‍या दोघांना पकडले. त्यांच्याकडून 1 लाख 61 हजारांचा गांजा आणि कार, मोबाइल असा सुमारे 9 लाख 84 हजार 680 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
रणजित लक्ष्मण जाधव (वय 24), लक्ष्मण रामू जाधव (दोघेही रा. पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी हा माण तालुक्यातील मोगराळे घाटात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना यांचे पथक तयार कारवाइसाठी पाठवले. दि. 4 रोजी सायंकाळी एलसीबीच्या पथकाने येणारी वाहने तपासण्यास सुरूवात केली. त्यावेळी घाटातून येणार्‍या एका कारमधून उग्र वास येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये गांजाची पोती सापडली. रणजित आणि लक्ष्मण या दोघांना घेऊन पोलीस सातार्‍यात आले. यानंतर त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गांजाची तस्करी करत असल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून 8 किलो 84 ग्रॅम वजनाचा 1 लाख 61 हजार रुपये किमतीचा गांजा तसेच दोन मोबाइल आणि कार असा सुमारे 9 लाख 84 हजार 680 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या दोघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडीचे उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, हवालदार साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधणे, अर्जुन शिरतोडे, अमोल माने यांनी केली.