डॉ.एन.डी. पाटील हे नैतिकता, ध्येयनिष्ठा, पारदर्शकता, निर्भयता, वैज्ञानिकता, सेक्युलर, विवेकी व निर्भयता ठासून भरलेले कृतीशील विचारांचे महापुरुष होते, असे मत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.
सातारा : डॉ.एन.डी. पाटील हे नैतिकता, ध्येयनिष्ठा, पारदर्शकता, निर्भयता, वैज्ञानिकता, सेक्युलर, विवेकी व निर्भयता ठासून भरलेले कृतीशील विचारांचे महापुरुष होते, असे मत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे शिवाजी काॅलेज व डॉ. एन.डी. पाटील मित्रमंडळ, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या लोकवाड्.मयगृह प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या एन डी सरांच्या किशोर बेडकिहाळ यांनी घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतीच्या पुस्तकाचे प्रकाशन छत्रपती शिवाजी काॅलेज मध्ये काॅलेजचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी किशोर बेडकिहाळ बोलत होते.
विचारमंचावर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शिवाजीराव पाटील, संस्थेचे माजी सचिव व शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे व डॉ.एन.डी.पाटील मित्रमंडळाचे सदस्य ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिनकर झिंब्रे उपस्थित होते.
किशोर बेडकिहाळ म्हणाले, रयत शिक्षण संस्था व शेतकरी कामगार पक्ष हा एन डी.सरांचा श्वास होता. या महान सावलीस आपण पारखे झालो आहोत. त्यांच्या ठायी महत्मा फुले-शाहू -आंबेडकर- महर्षी शिंदे यांच्या विचारांची प्रेरणा व तळमळ होती. ते मार्क्सवादी होते तरी त्यांच्यावर गांधीवादाचा संस्कार होता. त्यामुळे त्यांनी सर्व लढे शांततामय मार्गाने लढले. अल्पमतात असतानाही नैतिकतेच्या जोरावर बहुमतावर त्यांनी मात केली.
डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी अध्यक्षीय भाषणात डॉ.एन.डी. पाटील यांच्या संघर्षशील जीवनपट व समाज प्रबोधन कार्याचे अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने उत्तम विवेचन केले. प्रस्थापितां विरुद्ध शोषित वंचितांचा आवाज या महापुरुषाने रस्त्यावर आणि विधीमंडळातही बुलंदपणे मांडला आहे. दिशादर्शक असलेल्या या महापुरुषाच्या मुलाखतीचे पुस्तक सर्वांनी वाचले पाहिजे.
राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.शिवाजीराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. इतिहास विभाग प्रमुख डॉ.धनाजी मासाळ यांनी आभार मानले. डाॅ. चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. या प्रकाशन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


