maharashtra

मालगाव येथे चोरट्यांचा धुडगूस


मालगाव ता.सातारा येथे वृध्द दाम्पत्याच्या घरात घुसून तीन चोरट्यांनी धुडगूस घातला. दाम्पत्याला मारहाण करत त्यांच्या घरातून सुमारे 1 लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. या घटनेने परिसर हादरला असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.

सातारा : मालगाव ता.सातारा येथे वृध्द दाम्पत्याच्या घरात घुसून तीन चोरट्यांनी धुडगूस घातला. दाम्पत्याला मारहाण करत त्यांच्या घरातून सुमारे 1 लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. या घटनेने परिसर हादरला असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.
कालीदास आप्पाजी कदम (वय 72, रा. मालगाव) यांनी याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 15 रोजी घडली आहे. तक्रारदार कदम व त्यांची पत्नी दोघे घरी झोपले होेते. त्यावेळी तीन अनोळखी तिघे घरात घुसले. संशयितांनी वृध्द दाम्पत्याला दमदाटी, शिवीगाळ करत दहशत माजवली. या घटनेने दाम्पत्य घाबरले. वृध्द दाम्पत्याने चोरट्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मारहाण केली. लाकडी काठ्याने मारहाण झाल्याने दाम्पत्य जखमी झाले.
दाम्पत्याला घाबरवल्यानंतर यावेळी संशयितांनी 80 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणीमंगळसूत्र, 15 हजार रुपये किंमतीचे कर्णफुले, चांदीचे जोड, घरातील गुळ, चहा, पावडर, साखर असे संसारउपयोगी सुमारे 1 लाख रुपये किंमतीचे साहित्य जबरदस्तीने चोरी केले. दरम्यान, या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी दाम्पत्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेवून संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.