यवतेश्वर पठार ते कास फाटा मार्गे महाबळेश्वर पर्यंत मिनी ट्रेन वा टॉय ट्रेन सुरू करावी
भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी यांची उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी
यवतेश्वर पठार ते कास फाटा मार्गे महाबळेश्वर पर्यंत मिनी ट्रेन / टॉय ट्रेन सुरू करावी आणि साताऱ्याचे पर्यटन, रोजगार वाढवावे, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली,
सातारा : यवतेश्वर पठार ते कास फाटा मार्गे महाबळेश्वर पर्यंत मिनी ट्रेन / टॉय ट्रेन सुरू करावी आणि साताऱ्याचे पर्यटन, रोजगार वाढवावे, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली,
सातारा जिल्ह्याला निसर्गाची देणगी लाभलेली आहे. त्यात सातारा शहर हे सहा ताऱ्यांच्या म्हणजेच डोंगरांच्या कुशीत बसलेले शहर आहे आणि या साताऱ्याचा इतिहास सुद्धा खूप प्राचीन आहे.
जवळजवळ निम्या सातारा शहरासाठी पाणी पुरवठा हा कास तलाव येथून केला जातो. श्री. छ. प्रतापसिह महाराजांनी या ठिकाणावरून पाट काढून पाणी सातारा शहरापार्यंत आणले आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवली होती. नंतर बंदिस्त पाईपलाईन ने पाणी आणण्यात आले. या कास तलावाभोवती विपुल जंगलसामग्री आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी भरपूर वाव आहे. कास परिसरात अत्यंत दुर्मिळ अशी फुले येतात आणि ती पाहण्यासाठी देश विदेशातून अनेक पर्यटक आणि अभ्यासक या भागात येत असतात. कास पासून महाबळेश्वरपर्यंत एक ऐतिहासिक काळापासूनचा रस्ता जातो. हा रस्ता कास तलावाच्या अलीकडून महाबळेश्वर पर्यंत जातो. या वाटेवर सुद्धा निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. तसेच कास पठार ते बामणोली या भागात सुद्धा निसर्गसंपन्नता आहे.
कास ते बामणोली हा रस्ता १८ किलोमीटर आहे. कास तलावाचा परीघ जवळ जवळ ७ किलोमीटरचा आहे आणि कास ते महाबळेश्वर हा रस्ता ४० किलोमीटर आहे. साताऱ्याच्या पर्यटनास चालना मिळावी यासाठी यवतेश्वर पठार या ठिकाणी सर्व वाहने पार्क करून यावतेश्वर पठार पासून कास फाटा मार्गे महाबळेश्वर या अंतरासाठी माथेरान प्रमाणे मिनी ट्रेन / टॉय ट्रेन चालू करावी. या भागात मिनी ट्रेन / टॉय ट्रेन चालू झाल्यामुळे
* हजारो वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होईल.
* निसर्गाच्या विविधतेचा आस्वाद सर्वाना घेता येईल.
* महाबळेश्वर पर्यंत मिनी ट्रेन / टॉय ट्रेन गेल्यामुळे तेथील पर्यटक सुद्धा या भागात येऊन येथील पर्यटन आणि साधनसंपत्तीत वाढ होईल.
* या भागातील लोकांना रोजगार उत्पन्न होईल.
* एक नवीन स्वस्त साधन निर्माण झाल्याने कास कडे पर्यटनाच्या दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन वाढून लोक आकर्षीत होतील.
* मिनी ट्रेन / टॉय ट्रेन मुळे "कास पुष्प" पठारावरील गाड्यांच्या प्रदूषणामुळे नष्ट होणाऱ्या फुलांच्या जाती वाचतील.
* १२ महिने ही मिनी ट्रेन / टॉय ट्रेन चालू शकेल. यातील ९ महिने पर्यटक मोठ्या संख्येने उपयोग करतील.
* काही ठिकाणी प्रेक्षागॅलरी उभारल्याने पर्यटक त्या ठिकाणी थोडा वेळ थांबून निसर्ग सौन्दर्याचा लांबूनच आस्वाद घेतील. तसेच या ठिकाणी स्नॅक्स सेंटर्स उभारल्याने त्यांना सातारी चव अनुभवण्यास मिळेल आणि स्थानिकांना रोजगार सुद्धा उपलब्ध होतील.
हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हीच मिनी ट्रेन / टॉय ट्रेन पर्यटकांच्या सोयीसाठी कास तलावाच्या भोवती फिरवली जाऊ शकते. ही ट्रेन कास तलावाभोवती फिरवताना कोणतीही जंगलतोड किंवा पर्यावरणाची हानी न करता, पिलर्स वरून फिरवली जाऊ शकते.
या संकल्पनेतून या परिसरात वाढणारे पर्यटन, प्रदूषणमुक्ती आणि वाढणारे रोजगार या सर्वांचा विचार करून, यवतेश्वर पठार ते कास फाटा मार्गे महाबळेश्वर या मार्गावर मिनी ट्रेन/टॉय ट्रेन सुरू सुरु करून मिळावी आणि यासाठी लागणाऱ्या विविध विभागांच्या परवानग्या मिळण्यासाठी सहाय्य करावे, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
वास्तविक पाहता आपला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून म्हणजेच इंग्रजी राजवटीनंतर संपूर्ण भारतामध्ये कुठेही मिनी ट्रेन सुरू करण्यात आलेली नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करून मिनी इलेक्ट्रिक किंवा सोलर ट्रेन सुरू करता येईल का, याचीही शक्यता तपासून पहावी. सातारा जिल्हा हा क्रांती करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या नवीन विषयाची सुरुवात सुद्धा सातारा जिल्ह्यातूनच व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात हा प्रयोग पूर्ण ताकतीने राबवून पर्यटन विकासासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती करण्यात आली. या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या प्रकल्पबाबत पूर्ण माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवांशी यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच संबंधित विभागांची बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे.
या विषयासाठी २०१८ पासून पाठपुरावा चालू आहे. तसेच या निवेदनाच्या प्रती पुढील परवानग्या आणि कार्यवाहीसाठी, ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, ना. मंगल प्रसाद लोढा, मंत्री यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत, असे विकास गोसावी यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, सातारा शहर सरचिटणीस विक्रांत भोसले, नगरसेवक धनंजय जांभळे उपस्थित होते.


