चोरी करणारी टोळी 24 तासात जेरबंद
बोरगाव पोलीस ठाण्याची कारवाई; 5 लाख 95 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका चोरीच्या गुन्ह्याची उकल बोरगाव पोलीस ठाण्याने 24 तासात करून तिघा आरोपींना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 5 लाख 95 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सातारा : बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका चोरीच्या गुन्ह्याची उकल बोरगाव पोलीस ठाण्याने 24 तासात करून तिघा आरोपींना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 5 लाख 95 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
निकेत वसंत पाटणकर वय 29, अनिकेत वसंत पाटणकर वय 30 (दोघेही रा. नवीन एमआयडीसी, कोडोली, सातारा) आणि गणेश धनंजय ननावरे वय 24, रा. नांदगिरी, ता. कोरेगाव अशी तिघा संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत संत निरंकारी मंडळ, दिल्ली यांनी पुणे-बेंगलोर महामार्ग लगत असणाऱ्या खोडद येथे सत्संग सेवा करण्यासाठी संत निरंकारी मंडळाचे पत्र्याचे शेड बांधले आहे. या शेडमध्ये काही साहित्य ठेवण्यात आले होते दिनांक 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या कालावधीत चोरट्यांनी कंपाउंड व शेडचे कुलूप तोडून शेडमधील लोखंडी पाईप, पीव्हीसी पाईप, लोखंडी साखळ्या, लोखंडी पार, प्लास्टिकच्या खुर्च्या आणि इतर साहित्य अशा एकूण 35 हजार 850 रुपये किमतीच्या साहित्याची चोरी केल्याची तक्रार बोरगाव पोलीस ठाण्यात महेश सर्जेराव माने रा. काशीळ, ता. सातारा यांनी नोंदवली होती.
तक्रार दाखल झाल्यानंतर बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले आणि त्यांचे पथक यांनी गोपनीय बातमीदारांना सतर्क करून ते गुन्हेगारांच्या मागावर होते.
चोरट्यांचा शोध घेत असताना हे चोरटे पांढऱ्या रंगाच्या टाटा कंपनीच्या टेम्पोतून चोरीला गेलेला मुद्देमाल घेऊन निघाल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा लावून यातील तिन्ही आरोपींना जेरबंद केले. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली असून त्यांच्या कब्जातून चोरीमध्ये वापरलेला 5 लाख 50 हजार रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो क्रमांक एमएच 13 डी क्यू 2083 व 24 हजार रुपये किंमतीचे तीन अँड्रॉइड मोबाईल तसेच चोरीला गेलेल्या मालापैकी 21 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल असा एकूण 5 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण शिंदे, धनंजय जाधव, पोलीस नाईक राजू शिखरे, विजय साळुंखे, दादा स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल विशाल जाधव, प्रशांत मोरे, राहुल भोये, प्रकाश वाघ यांनी केली आहे.


