maharashtra

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलावर कृष्णा हॉस्पिटलकडून मोफत उपचार

डॉ. सुरेश भोसले यांचा निर्णय : बिबट्याशी झुंज देणाऱ्या पित्याच्या धाडसाचे कौतुक

Free treatment from Krishna Hospital for a child injured in a leopard attack
किरपे, ता. कराड येथील राज धनंजय देवकर (वय ५) या शेतकऱ्याच्या मुलावर नुकताच बिबट्याने हल्ला केला होता. यामध्ये जखमी झालेल्या राज देवकरवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च माफ करण्याचा निर्णय कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी घेतला आहे.

कराड : किरपे, ता. कराड येथील राज धनंजय देवकर (वय ५) या शेतकऱ्याच्या मुलावर नुकताच बिबट्याने हल्ला केला होता. यामध्ये जखमी झालेल्या राज देवकरवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च माफ करण्याचा निर्णय कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी घेतला आहे.
दरम्यान डॉ. सुरेश भोसले आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी मुलाच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच बिबट्याशी झुंज देणारे मुलाचे वडिल धनंजय देवकर यांच्या धाडसाचे त्यांनी कौतुकही केले आहे. किरपेत २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शेतीकामासाठी वडिलांसोबत गेलेल्या राज देवकर या ५ वर्षाच्या मुलावर बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने त्याच्या मानेला पकडून शेतात फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी त्यांचे वडील धनंजय देवकर यांनी बिबट्याशी दोन हात करत आपल्या मुलाला बिबट्याच्या जबड्यातून सहीसलामत सोडविले. परंतु, या झटापटीत मुलाच्या मानेला व शरीरावर जखमा झाल्या असून त्याला उपचारासाठी तातडीने कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
या प्रकाराची माहिती समजताच कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी जखमी मुलाच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच त्याच्यावरील उपचारांकडे विशेष लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. त्याचबरोबर बिबट्याशी झुंज देणारे राजचे वडिल धनंजय देवकर यांच्या धाडसाचे कौतुक करत या मुलावरील वैद्यकीय उपचाराचा संपूर्ण खर्च माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.