maharashtra

जागतिक वन दिनानिमित्त पर्यटकांसाठी रात्रीची जंगल सफर

वन विभागाचा सातारा जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम

Night forest trip for tourists on the occasion of World Forest Day
जागतिक वन दिनानिमित्त सातारा आणि महाबळेश्वर तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता रात्रीची जंगल सफर करण्याचा आनंद लुटता येणार आहे. सातारा जिल्हा वन विभागाने हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून या सफरीच्या निमित्ताने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना रात्रगस्त घालता येईल, अशी माहिती जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अधिकारी महादेव मोहिते यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली.

सातारा : जागतिक वन दिनानिमित्त सातारा आणि महाबळेश्वर तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता रात्रीची जंगल सफर करण्याचा आनंद लुटता येणार आहे. सातारा जिल्हा वन विभागाने हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून या सफरीच्या निमित्ताने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना रात्रगस्त घालता येईल, अशी माहिती जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अधिकारी महादेव मोहिते यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम असून पर्यटकांनी रात्रीच्या जंगल सफारीचा अनुभव लुटावा, असे आवाहन मोहिते यांनी केले आहे.
महादेव मोहिते पुढे म्हणाले, काही भाग सातारा आणि काही भाग जावली तालुक्यात मोडणाऱ्या कास पठाराची महती जगभरात प्रसिद्ध आहे. कास पठार वगळता महाबळेश्वर, जावली आणि सातारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती, जंगले आहेत. वन विभागाच्या हद्दीत काही पर्यटन स्थळे देखील आहेत. याचा सारासार विचार करून जागतिक वनदिनाचे औचित्य साधून म्हणजेच दि. २१ मार्च २०२२ पासून महाबळेश्वर, जावळी आणि सातारा तालुक्यात पर्यटक, पर्यावरण आणि वन्यप्रेमीसाठी यांच्यासाठी रात्रीची जंगल सफर ही सुविधा निर्माण करून देण्यात येणार आहे. त्यासाठी चार सफारी गाड्यांचा वापर करण्यात येणार आहे. महाबळेश्वर येथुन कास, तापोळा, प्रतापगड, पार तर सातारा येथुन बामणोली, मुनावळे, अंबवडे, ठोसेघर, चाळकेवाडी पठार येथे सफारी गाड्यांच्या माध्यमातून पर्यटकांना जंगलाची सफर करून देण्यात येणार आहे.
जंगल सफर अनुभवताना पर्यटकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली असून प्रत्येक सफारी गाडीच्या बरोबर अथवा पाठीमागील सहा ते आठ जणांचे वन विभाग आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे एक पथक असेल. रात्रीची जंगल सफर करताना पर्यटकांना वन्य प्राण्यांचे दर्शन, रात्रीच्या टिपुर चांदण्यात धबधबा, शिवसागर जलाशय पाहण्याची पर्वणी मिळणार आहे. प्रत्येक सफारी गाडी समवेत सुरक्षेची खबरदारी म्हणून एक वायरलेस फोन देण्यात येणार आहे. पर्यटकांना रात्रीच्या जंगल सफारीचा अनुभव घेता यावा, महाबळेश्वर, जावली, सातारा या तालुक्यातील पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळावी, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा हाच या उपक्रमापाठीमागचा उद्देश आहे.
रात्रीच्या जंगल सफारीचा अनुभव लुटण्यासाठी पर्यटकांनी कोणत्या वेबसाईटवर ऑनलाइन बुकींग करावे, प्रतिव्यक्ती किती रुपये शुल्क आकारले जावे याचा प्राथमिक आराखडा तयार केला जात असून त्याबाबतची माहिती दि. १८ ते १९ मार्च रोजी माध्यमांना दिली जाईल, अशी माहितीही महादेव मोहिते यांनी यावेळी दिली. या उपक्रमाची जबाबदारी त्या- त्या स्थानिक संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार असुन या उपक्रमाला पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिल्यास सातारा जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्याचा विचार वन विभागाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
अनेकदा पाण्याच्या शोधार्थ आपला अधिवास सोडून वन्यप्राणी शहराकडे येत असल्याचे दिसून येत असल्यामुळे वन विभागाच्या माध्यमातून बहुतांश ठिकाणी वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करण्यात आले आहेत, असे सांगून महादेव मोहिते पुढे म्हणाले, रात्रीची जंगल सफर या उपक्रमामुळे वन्य प्राण्यांच्या होणाऱ्या शिकारी थांबण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. या सफरीच्या निमित्ताने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी गस्त घालता येईल.

हॉटेल व्यवसायाला येणार सुगीचे दिवस
महाबळेश्वर जावली आणि सातारा तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असली तरी त्यामध्ये पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, गुजरातसह अन्य राज्यातील पर्यटकांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. रात्रीची जंगल सफर हा उपक्रम सुरू झाल्यानंतर महाबळेश्वर, बामणोली, तापोळा, कास आणि ठोसेघर येथील हॉटेल व्यवसायाला सुगीचे दिवस येणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.