maharashtra

अखेर कराडमधील 9 फूटी मगर पकडण्यात वनविभागाला यश

ग्रामस्थांनी घेतला सुटकेचा नि:श्वास; 3 दिवसांपासून होता शोध सुरू

खोडशी ग्रामस्थ मगरीच्या दहशतीखाली होते. वनविभागाने देखील ग्रामस्थांना दक्ष राहण्याची सूचना करत ब्रिटिशकालीन बंधाऱ्यात न उतरण्याचे आवाहन केले होते. वनविभागाचे कर्मचारी गेली तीन दिवस मगरीला पकडण्याचे प्रयत्न करत होते. अखेर मगरीला पकडण्यात वनविभागाला यश आल्यानंतर खोडशी ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराडजवळच्या खोडशी गावातील चौकात दिवाळीच्या पूर्वसंध्येला अर्थात रविवारी (दि. 23) रात्री तब्बल 9 फूट लांबीच्या मगरीचे ग्रामस्थांना दर्शन झाले होते. तेव्हापासून खोडशी ग्रामस्थ मगरीच्या दहशतीखाली होते. वनविभागाने देखील ग्रामस्थांना दक्ष राहण्याची सूचना करत ब्रिटिशकालीन बंधाऱ्यात न उतरण्याचे आवाहन केले होते. वनविभागाचे कर्मचारी गेली तीन दिवस मगरीला पकडण्याचे प्रयत्न करत होते. अखेर मगरीला पकडण्यात वनविभागाला यश आल्यानंतर खोडशी ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
खोडशी (ता. कराड) गावातील मानवी वस्तीमध्ये असणार्‍या मुख्य चौकात रविवारी रात्री तब्बल 9 फूट लांब मगरीचे ग्रामस्थांना दर्शन झाले होते. यामुळे वनविभागाकडून दक्ष राहण्याची सूचना करत पाण्यात उतरताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले होते. काही दिवसांपासून तालुक्यातील टेंभू धरण, आटके ते पाचवड फाटा या परिसरात स्थानिक शेतकर्‍यांसह ग्रामस्थांना मगरीचे दर्शन होत आहे. या घटना ताज्या असतानाच खोडशी गावानजीक असणार्‍या बंधार्‍यातही मगरीचा वावर असल्याचे आता स्पष्ट झाले. 15 दिवसांपूर्वी खोडशी परिसरात असणार्‍या खडकावर मगर विश्रांती घेत असल्याचे काहींना दिसले होते.
यापूर्वीही झाले दर्शन
हीच मगर पुन्हा एकदा रविवारी रात्री खोडशीतील कृष्णा डेअरी चौकात दिसली होती. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मगर पाहण्यासाठी गर्दी केली. याच कालावधीत वनविभागाला सुद्धा माहिती देण्यात आली होती. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होईपर्यंत मगर बंधार्‍याच्या परिसरातील ओढ्यात निघून गेली होती.
खोडशीसह परिसरात खळबळ…
कराड तालुक्यात मागील वर्षभरापासून नदीकाठच्या गावात वारंवार मगरीचे दर्शन होत आहे. त्यामुळेच पोहण्यासाठी जाताना दक्षता घेणे आवश्यक बनले असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.