गेली दोन वर्षे करोना आजाराच्या त्रासामुळे राज्यातीलच नव्हे तर सर्व देशातील सण उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांना मोठी अडचण होती. मात्र यावर्षी सर्वच निर्बंध शिथिल झाल्यानंतर यावर्षीची जन्माष्टमी गुरुवारी मोठ्या उत्साहात संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली.
सातारा : गेली दोन वर्षे करोना आजाराच्या त्रासामुळे राज्यातीलच नव्हे तर सर्व देशातील सण उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांना मोठी अडचण होती. मात्र यावर्षी सर्वच निर्बंध शिथिल झाल्यानंतर यावर्षीची जन्माष्टमी गुरुवारी मोठ्या उत्साहात संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली.
सातारा शहरातील विविध श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्णाचा जन्म सोहळा आज श्री श्रावण वद्य अष्टमीला मोठ्या भक्ती भावात संपन्न झाला. सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील दिवशीकर बंधू यांच्या श्री मुरलीधर मंदिरात जन्माष्टमीनिमित्त दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी मोठ्या प्रमाणात आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती.
बुधवारी सायंकाळी वेदमूर्ती गोविंद शास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ब्रह्मावृंदांच्या उपस्थितीत मंत्र जागर करण्यात आला. तसेच वेदमंत्रांचे पठण करण्यात आले. त्यानंतर श्री रामकृष्ण सेवा मंडळाच्या वतीने श्यामनाम संकीर्तन संपन्न झाले.
आज गुरुवारी सकाळी वेदमूर्ती माधव शास्त्री भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनीत दिवशीकर यांचे हस्ते श्रीकृष्ण मूर्तीला पवमान, पंचामृत अभिषेक करण्यात आला. तसेच विशेष पूजा रात्री बारा वाजता जन्म काळाच्या वेळी संपन्न झाली. यावेळी श्री विष्णुसहस्त्रनामाचे पठण तसेच सहस्त्र तुलसी दल अर्पण करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे सातारा शहर परिसरातील खण आळी येथील श्री राधाकृष्ण मंदिर, संगमनगर परिसरातील श्री नटराज मंदिरातील श्री राधाकृष्ण मंदिरातही जन्मोत्सव साजरा करण्यात आला. जन्माष्टमीनिमित्त नटराज मंदिरात आज सकाळी व दुपारी तुला दान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच उद्या शुक्रवारी राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा सायंकाळी पाच ते सहा वेळात लहान मुला मुलींसाठी आयोजित करण्यात आले आहेत. सातारा शहरातील करंजे भागातील श्री महानुभाव मठातही श्रीकृष्ण मंदिरात जन्माष्टमीनिमित्त विशेष पूजा करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
फलटण तालुक्यातील गिरवी येथील देशपांडे यांच्या सुप्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरात तसेच माण तालुक्यातील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या समाधी स्थळावर असलेल्या गोपाळ कृष्ण मंदिरातही हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रात्री बारा वाजता जन्मकाळाचे वेळी नाम घोष करून त्यानंतर महाआरती संपन्न झाली आणि प्रसाद व सुंठवड्याचे वितरण करण्यात आले. शुक्रवारी गोपाळकाला निमित्त दहीहंडी तसेच काल्याचे किर्तन होऊन या उत्सवाची सांगता होणार आहे.


