नांदगावात बिबट्याचा वावर
बिबट्या सीसीटीव्हीत कैद; बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
नांदगाव, ता. कराड येथे बिबट्याचा वावर वाढला आहे. रविवारी ६ रोजी रात्री गावातील एसटी स्टँड परिसरात बिबट्या रस्त्यावरून फिरताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्यामध्ये घाबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
कराड : नांदगाव, ता. कराड येथे बिबट्याचा वावर वाढला आहे. रविवारी ६ रोजी रात्री गावातील एसटी स्टँड परिसरात बिबट्या रस्त्यावरून फिरताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्यामध्ये घाबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
तालुक्यातील कासारशिरंबे, कालवडे व नांदगावच्या शिवारात वारंवार स्थानिक ग्रामस्थांना वेळोवेळी बिबट्याचे दर्शन होत आहे. 4 महिन्यापूर्वी नांदगावातील गाव विभाग परिसरात बिबट्याने वस्तीत असणाऱ्या शेळ्यांचा फडशा पाडला होता. तेव्हापासून ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी वनविभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी गावात भेटी देऊन बिबट्याचे ठसे पाहिले होते.
परंतु, त्यानंतरही ग्रामस्थांना शिवारात बिबट्याचे दर्शन होत असून ग्रामस्थांची भीती वाढली आहे. त्यामुळे शेतामध्ये काम करायला जाताना शेतकरी घाबरत असून मजूरही शेतात काम करायला धजवत नाहीत. रविवारी रात्रीही नांदगाव एसटी स्टँड परिसरातील दत्त मंदिरानजीक बिबट्या फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे वनविभाग लोकांवर बिबट्याचा हल्ला होण्याची वाट पहात आहे का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.


