maharashtra

तुम्ही समाजासाठी काय करणार ते सांगा !

मराठा आंदोलकांचा आमदार शशिकांत शिंदे यांना सवाल

कोणीही राजकीय नेत्यांनी मराठा आंदोलनाच्या मंडपात फिरकायचे नाही, अशा शब्दात आमदार शशिकांत शिंदे यांना मराठा आंदोलनकर्त्यानी सुनावत आता तुम्ही काय करणार समाजासाठी ते सांगा, असे प्रश्न विचारुन त्यांना जेरीस आणले.

सातारा : राज्यात ५८ मोर्चे काढले. अनेक तरुणांनी आपली जीवनयात्रा संपवली. मराठा आरक्षणासाठी तुम्ही मराठा म्हणून मराठा समाजाचा प्रश्न आजपर्यंत विधानसभेत, विधान परिषदेत मांडला काय?, राज्यात जेवढे १४७ मराठा आमदार आहेत त्यांनी मराठा समाजासाठी अगोदर राजीनामा द्यायचा मगच आंदोलनाच्या व्यासपीठावर यायचे, कोणीही राजकीय नेत्यांनी मराठा आंदोलनाच्या मंडपात फिरकायचे नाही, अशा शब्दात आमदार शशिकांत शिंदे यांना मराठा आंदोलनकर्त्यानी सुनावत आता तुम्ही काय करणार समाजासाठी ते सांगा, असे प्रश्न विचारुन त्यांना जेरीस आणले. दरम्यान, त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करतो अशी ग्वाही आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिली.
मराठा समाजाचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरु आहे. रविवारी या आंदोलनाला सातारा तालुक्यातील अपशिंगे मिल्ट्री, चिंचणेर, कोंडवे, सैदापूर या गावातील मराठा युवकांनी दुचाकीची रॅली काढून आपला पाठींबा दर्शवला. त्यांनी दुचाकी रॅली पोवई नाका मार्गे छ. शाहु महाराज चौक, राजपथ, गोलबागेला वळसा मारुन पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आंदोलनस्थळी सहभागी झाले. तरुणांनी आरक्षण कसे महत्वाचे आहे हे आपल्या भाषणातून सांगितले.
दरम्यान, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे हे आले होते. तेव्हा त्यांना आंदोलनकर्त्यांनी मंडपात न येता बाहेरच थांबण्याची विनंती केली. मंडपाबाहेर आमदार शशिकांत शिंदे हे उभे असताना त्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आजपर्यंत तुम्ही समाजासाठी काय केले. एवढा मोठा अन्याय समाजावर होत आहे. इतर समाजाचे आमदार त्यांच्या समाजासाठी लगेच विधानसभा, विधीमंडळात आवाज उठवत असतात. १९९४ ला इतर समाजाला आरक्षण दिले गेले. त्यामुळे मराठा समाजावर अन्याय झालेला आहे. तुम्ही फक्त निवडणूका आल्या की मताची बोळवण करण्यासाठी मराठा आरक्षणाचा काकडा हातात घेता, हे चालणार नाही. मराठा समाज आता जागा झाला आहे. तुम्ही तुमचे राजकारण बाजूला ठेवा. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नेमके काय केले ते सांगा, आता काय करणार आहे, तेही जाहीर करा, अशी विनंती केली.
त्यावर अचानक झालेल्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे आमदार शशिकांत शिंदे यांनीही अगदी संयमाने उत्तर दिले. मी एक मराठा म्हणून आंदोलनाला पाठींबा द्यायला आलेलो आहे. मी समाजासाठी बरेच काही केले आहे. आताही येथे शब्द देतो की सोमवारी मुंबईला गेल्यानंतर राज्य शासनाचे विशेष
अधिवेशन लवकरच मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने बोलवण्याची मागणी करतो, असे आश्वासन दिले. तब्बल एक तासभर हा कार्यक्रम सुरु होता.

युवकाची पाटी लक्षवेधी
आंदोलनस्थळी एक युवक हातात पाटी घेवून उभा होता. त्या पाटीवर सातारा मेडिकल कॉलेज येथे खुल्या प्रवर्गातील युवकांवर अन्याय होत असून याच मागणीसाठी हातात बोर्ड घेवून राजाळेचा युवक आकाश निंबाळकर याने आंदोलन केले. त्याच्या आंदोलनाची दखल घेत त्यास आयोजकांनी जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सुनील काटकर यांच्याकडे नेले. त्या युवकाने आपली कैफियत मांडली.

तात्या सांवत यांच्या प्रकृतीची तपासणी
गेली तीन दिवस सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ७४ वर्षाचे तात्या सावंत हे बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांच्या प्रकृतीची तपासणी जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने केली.