विसापूर ता. खटाव येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे हे लेह लडाख येथे देशसेवा बजावत होते. भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत अपघातग्रस्त झाले. या अपघातात त्यांना वीरमरण आले. त्यांच्या वीरगतीमुळे गेली दोन दिवस विसापूरसह संपूर्ण खटाव तालुका शोकसागरात बुडाला आहे.
पुसेगाव : विसापूर ता. खटाव येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे हे लेह लडाख येथे देशसेवा बजावत होते. भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत अपघातग्रस्त झाले. या अपघातात त्यांना वीरमरण आले. त्यांच्या वीरगतीमुळे गेली दोन दिवस विसापूरसह संपूर्ण खटाव तालुका शोकसागरात बुडाला आहे.
विजय सर्जेराव शिंदे हे सन 1998 मध्ये 22 मराठा लाईट इन्फंट्री मध्ये लष्करी सेवेत रुजू झाले. 24 वर्षाच्या कालावधीत त्यांनी लष्करात विविध ठिकाणी काम करून देशाचे संरक्षण केले. लष्करात सध्या त्यांचे पोस्टींग लेह-लडाख येथे होते. सुभेदार पदावर ते कार्यरत होते. 26 जवानांचे परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उपसेक्टर हनिफच्या फॉरवर्डकडे जात असताना शुक्रवारी सकाळी 9 वा. लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत पडले. या अपघातात 7 सैनिकांना वीरगती मिळाली. त्यात सुभेदार विजय शिंदे यांचा समावेश आहे. शहीद विजय शिंदे यांचे पार्थिव शनिवारी सकाळी लेह लडाख येथून दिल्ली येथे दुपारी 3 वा. पोहचले. दिल्ली विमातळावर वीरगती प्राप्त 7 जवानांना लष्कराने मानवंदना दिली. त्यानंतर रविवारी पहाटे पुणे येथे पार्थिव येणार आहे.
सुभेदार विजय शिंदे यांचे पार्थिव रविवार दि. 29 रोजी सकाळी 10 वा. विसापूर येथे पोहोचणार आहे. शहीद सुभेदार विजय शिंदे यांचे पार्थिव निवासस्थानी कुटुंबीय व नातेवाईकांच्या अंत्यदर्शनासाठी नेण्यात येईल. यानंतर संपूर्ण गावातून सजविलेल्या रथातून अंत्ययात्रा, श्री वाघेश्वरी मंदिराशेजारील चावडी चौकात एका स्टेजवर शहीद सुभेदार विजय शिंदे यांचे पार्थिव सर्वांकरता दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शहीद विजय शिंदे यांच्या कुंभारकी शिवारातील शेतात अंत्यविधी कार्यक्रम होईल, अशी माहिती विसापूरच्या ग्रामस्थांनी दिली आहे.


