maharashtra

राष्ट्रवादीच्या राजकीय षडयंत्राला आता जशास तसे उत्तर देणार

आमदार जयकुमार गोरे यांचा पत्रकार परिषदेत घणाघात; राजकीय दबावातून तपास न करण्याचे केले पोलिसांना आवाहन

The NCP's political conspiracy will now be answered in the same way
माझ्यावर जे राजकीय आकसातून गुन्हे दाखल झाले त्याच्या पाठीमागे संपूर्ण राष्ट्रवादी आहे. मायणी मेडिकल कॉलेजचे विश्वस्त एम. आर. देशमुख हे निमित्त आहे. पण आमदार गोरे कोणाला घाबरणारा आमदार नाही. राष्ट्रवादी च्या राजकीय षडयंत्राला जशास तसे प्रत्युत्तर देणार, असा दमदार घणाघात आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला

सातारा : 'आमने-सामने'चा राजकीय संघर्ष करण्याची धमक राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाही. आमदार जयकुमार गोरे यांचा पिंड राजकीय संघर्षाचा आहे आणि मला कोणी थांबवू शकत नाही. माझ्यावर जे राजकीय आकसातून गुन्हे दाखल झाले त्याच्या पाठीमागे संपूर्ण राष्ट्रवादी आहे. मायणी मेडिकल कॉलेजचे विश्वस्त एम. आर. देशमुख हे निमित्त आहे. पण आमदार गोरे कोणाला घाबरणारा आमदार नाही. राष्ट्रवादी च्या राजकीय षडयंत्राला जशास तसे प्रत्युत्तर देणार, असा दमदार घणाघात आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला
एक दिवस माझे निर्दोषत्व नक्कीच सिद्ध होईल. मात्र एवढ्या हिणकस पातळीवर जाऊन राजकारण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करू नये व पोलिसांनी माझ्यावर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात जी तत्परता दाखवली तीच तत्परता मायणी मेडिकल कॉलेजच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणात दाखवावी. कोणाच्या राजकीय दबावामध्ये पोलिसांनी तपास करू नये. आपला सचिन वाझे होणार नाही, याची काळजी पोलिसांनी घ्यावी. असे आवाहनही गोरे यांनी यावेळी तपास यंत्रणांना केले.
आमदार जयकुमार गोरे यांना त्यांच्यावर दाखल गुन्ह्यासंदर्भात अटकपूर्व जामीन मिळताच त्यांनी शनिवारी शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या एकूणच आकसापोटी चाललेल्या रणनीतीवर षडयंत्र असल्याचा आरोप करत त्यांना जशास तसे उत्तर देण्याची तयारी असल्याचे खुले आव्हान दिले. यावेळी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील पाटील, शहराध्यक्ष विकास गोसावी इ यावेळी उपस्थित होते.
आमदार जयकुमार गोरे पुढे म्हणाले, मायणी मेडिकल कॉलेज मी चालवायला घेतले नव्हते. तशी माझी कोणतीही इच्छा नव्हती. मायणी मेडिकल कॉलेजचे विश्वस्त एम. आर. देशमुख स्वतःहून माझ्याकडे येऊन मी प्रचंड अडचणीत असून आपण कॉलेज चालवायला घ्यावे, ही विनंती गेल्या सहा महिन्यापासून करत होते. मेडिकल कॉलेज कर्जबाजारी होते. त्याला एमबीबीएसची परवानगी नव्हती. बांधकामाला परवानगी नव्हती. तेथील जमिनी अकृषक केलेल्या नव्हत्या. तरीसुद्धा मायणी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या वर्षाचे शंभर जागांची त्यांची परवानगी असताना साडेनऊशे विद्यार्थ्यांचे ऍडमिशन घेण्यात आले. या ऍडमिशन पोटी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 10 ते 50 लाखापर्यंत च्या ॲडमिशन फी गोळा करून संबंधित ट्रस्टने 68 ते 70 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप जयकुमार गोरे यांनी केला. या मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने येथे प्रांत जिल्हाधिकारी यांचे बोगस शिक्के बनवून विद्यार्थ्यांचे प्रवेश पात्र ठरण्यासाठी बोगस सीबीएससी बोर्डाचे बोगस गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र बनवण्यात आले. मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने साडे चौदा कोटी रुपयाचे एचडीएफसी कडून कर्ज उचलण्यात आले. यामध्ये कोणतेही मेडिकल चे साहित्य खरेदी करण्यात आले नाही. प्राप्त तीन पुरवठा ठेकेदारापैकी दोघांनी आम्ही कोणतेही साहित्य दिले नसल्याचे स्पष्टपणे उत्तर दिले आहे. मायणी मेडिकल कॉलेजच्या उभारणीमध्ये प्रचंड गुंतागुंत आहे. कॉलेजच्या इमारतीची किंमत 45 ते 50 कोटी रुपये असून त्या कॉलेजवर तब्बल दीडशे कोटी रुपयांचे कर्ज आहे. असे असताना आम्ही त्यात लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाच्या माध्यमातून कॉलेजला 20 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्या मॅनेजमेंटच्या अटीवर आम्ही हे कॉलेज ट्रस्टी म्हणून चालवायला घेतले आणि आयुष्यात पहिल्यांदा या कॉलेजच्या उभारणीसाठी जयकुमार गोरे यांनी स्वतःच्या नावावर कर्ज घेऊन या कॉलेजचे देणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र देशमुखांनी कर्ज करायची आणि ती जयकुमारने फेडायची, असे होणार नाही. प्रत्येक गैरव्यवहाराचा हिशोब हा झालाच पाहिजे. याकरिता या प्रकरणाची केंद्रीय गुप्तचर यंत्रणेमार्फत स्वायत्त चौकशी व्हावी याचा मी स्वतंत्र प्रस्ताव दिलेला आहे. मात्र या प्रकरणाची दीड वर्षापूर्वी तक्रार करूनही सातारा जिल्हा पोलिसांनी या प्रकरणाचा कोणताही तपास केला नसल्याचा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये या कॉलेजच्या निमित्ताने अनेक बोगस डॉक्टर तयार झाले असून देशमुखांच्या घरातच पाच बोगस डॉक्टर आहेत. आर्थिक गैरव्यवहार कसा करावयाचा हे शिकण्यासाठी देशमुख परिवाराकडून नक्कीच प्रशिक्षण घ्यावं, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. जमिनीच्या बोगस दस्त व्यवहारासंदर्भात बोलताना आमदार गोरे पुढे म्हणाले, या प्रकरणांमध्ये माझी सही व शपथपत्र हे संपूर्णपणे खोटे आहे. यामध्ये जर मी अपराधी साबित झालो तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन. मूळ तक्रारदार हा अत्यंत गरीब असून त्याचे नुकसान होईल असे कोणतेही वर्तन आम्ही केलेले नाही. त्याची तक्रार करण्याची इच्छा नव्हती. या प्रकरणांमध्ये जयकुमार गोरे याला कसे अडकवता येईल या माध्यमातून या तक्रारी दाखल केल्या जात आहेत. मात्र आमदार जयकुमार गोरे हा घाबरणारा नाही. माझा मूळचा पिंड संघर्ष करण्याचाच आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्या विरोधात रचलेले हे राजकीय षड्यंत्र असून अत्यंत हीन पातळीवर जाऊन माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. याचा त्रास अगदी माझ्या कुटुंबीयांनी पासून ते कार्यकर्त्यांना भोगावा लागलेला आहे. निखळ राजकारणाची क्षमता राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाही. भाजपचा आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ही जोडी राजकारणात पुढे येत आहे हे काही जणांच्या पोटात दुखते. म्हणून त्यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या या खेळ्या सुरू आहेत. ज्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले त्या संदर्भातल्या सरकारी वकिलांची फी सभापतींच्या केबिनमधून दिली जाते व त्याची प्लॅनिंग सुद्धा त्यांच्या केबिनमध्ये ठरतात, असा आरोप आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता केला. यांच्यात जर धमक असती तर त्यांनी समोरासमोरच्या संघर्ष केला असता. पण त्यांच्यात ती कुवत नसल्याने देशमुखांच्या आडून माझ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मी आता गप्प बसणार नाही. राष्ट्रवादींच्या या षड्यंत्राचा जशास तसे उत्तर देणार. जे लोक काचेच्या घरात राहतात त्यांनी काँक्रिटच्या घरात राहणाऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावतंत्रामध्ये न येता सर्वसामान्यांच्या गुन्ह्यांचा निष्पक्ष तपास करावा. माझ्या मेहुणीला रात्री चार वाजता गुन्हा दाखल करून सकाळी सात वाजता मुंबईत अटक करण्यासाठी पोहोचणारे सातारा पोलीस मायणी मेडिकल कॉलेजच्या बोगस प्रकरणाची दीड वर्ष तक्रार करून का तपास करत नाहीत, यातच काय समजायचे ते समजते. पोलिसांनी आपला सचिन वाझे होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण वेळप्रसंगी कोणताही उच्चपदस्थ मंत्री आपल्याला वाचवायला येत नाही. पोलिसांनी कर्तव्यबुद्धीने आपल्याकडील तपासाची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यावेळी म्हणाले, आमच्या दोघांवर तक्रार करण्याचा एकच मुहूर्त काढण्यात आला होता. माझ्यावर तर तब्बल 40 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. त्याच्यामध्ये पाच लिटर पेट्रोलच्या चोरीचा गुन्हा सुद्धा दाखल आहे. माझ्यावर उरल्यासुरल्या सर्वच कलमांचे गुन्हे दाखल करा म्हणजे त्यांची संख्या शंभर होईल, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. जर फलटणकर यांच्यात जर दम आहे तर त्यांनी 2024 ची आगामी लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी, असे खुले आव्हान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे यांना दिले.
आमदार जयकुमार गोरे यावेळी म्हणाले की, माझा पक्ष माझ्याबरोबर संपूर्ण ताकतीने उभा आहे, या संपूर्ण प्रकरणांमध्ये मी आजपर्यंत कधी तडजोड केली नाही. प्रभाकर घार्गे हे माझे कट्टर विरोधक आहेत. तरीसुद्धा त्यांना माणुसकीच्या नात्याने भेटायला मी कारागृहामध्ये गेले होतो. जर मी रामराजे यांच्याशी तडजोड केली असती तर जिल्हा बँकेत माझेही तीन संचालक दिसले असते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमने-सामने ची लढाई करावी असे बायकी पद्धतीचे गुन्हे दाखल करून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये. त्यांचा मुकाबला करण्यासाठी आमदार जयकुमार कायमच सज्ज आहे, असे आव्हान गोरे यांनी दिले.