सातारा पालिकेच्या नूतन इमारतीसाठी वीस कोटी
शिवतीर्थ पुतळा परिसर विकासासाठी आठ कोटी, खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती
सातारा पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या 60 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकीय कामास यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. सध्या इमारतीच्या खुदाईचे काम अंतिम टप्प्यात आहे.
सातारा : सातारा पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या 60 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकीय कामास यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. सध्या इमारतीच्या खुदाईचे काम अंतिम टप्प्यात आहे. उपलब्ध एकूण निधी पैकी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून वीस कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
पोवई नाका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याचेही त्यांनी कळवले आहे. जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की, साताऱ्याच्या लौकिकात भर पडेल अशी इमारत विसावा नाका परिसरात उभी करण्यात येत असून त्याला 60 कोटी रुपये खर्च येत आहे. या कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेबद्दल यापूर्वी दहा कोटी निधी मिळालेला आहे. याच कामासाठी नगर विकास विभागाकडून वीस कोटीचा निधी शासनाने दिला आहे. त्यामुळे प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी उद्योजक बाबासाहेब कल्याणी यांनी नाममात्र एक रुपया पालिकेस 40 गुंठे जागा दिली. अशी जागा नाममात्र दरात मिळाल्याने पालिकेची कोट्यावधी रुपयांची बचत झाली. भविष्यातील तंत्रज्ञान नागरिकांना पुरवले जाणाऱ्या सेवा यांचा अतिशय बारकाईने अभ्यास करून या इमारतीचा बांधकाम आराखडा तयार केला आहे.
राजधानी साताऱ्यातील पोवई नाका येथील छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा आणि सातारकरांना सातत्याने प्रेरणा देत आहे. या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी पहिल्यांदा जिल्हा नियोजन समितीने तीन कोटी रुपयांचा निधी दिला होता. या परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी जास्त निधीची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही सुशोभीकरणाचा प्रस्ताव सादर केला होता. शिंदे यांनी या कामासाठी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार नगर विकास खात्यांमधून आठ कोटी रुपयांचा निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. या निधीतून येथील कामांना चालना दिली जाणार असून शिवछत्रपतींचा पुतळा असणाऱ्या प्रेरणास्थानातून सर्वांना अखंडपणे ऊर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


