maharashtra

मुख्याधिकार्‍यांच्या लेखी आश्‍वासनानंतर इम्रान मुल्ला यांचे उपोषण स्थगित


Imran Mulla's fast postponed after written assurance from Chief Officer
राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्यावतीने इम्रान मुल्ला आणि सहकार्‍यांनी दिनांक 6 पासून सुरु केलेले उपोषण मुख्याधिकार्‍यांच्या लेखी आश्‍वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे.

सातारा : राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्यावतीने इम्रान मुल्ला आणि सहकार्‍यांनी दिनांक 6 पासून सुरु केलेले उपोषण मुख्याधिकार्‍यांच्या लेखी आश्‍वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्यावतीने दिनांक 6 जून रोजी जिल्हाधिकारी सातारा यांना कराड नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.
निवेदनात असे म्हटले होते की, कराड नगरपालिकेने कै. सतीश पांडुरंग भिसे यांच्या निधनानंतर वारसाहक्काने लाड पागे परिपत्रकानुसार कुटुंबात न राहणारे व्यक्तीची बेकायदेशीर नेमणूक करून शासकीय परिपत्रकाची अवमूल्यन केले आहे. त्याची दुरुस्ती करून कुटुंबातील सदस्यांची संमती घेऊन पुन्हा नेमणूक करावी. तसेच कराड नगरपालिकेचे अकाउंट विभागातील कर्मचारी कमलेश रवी होणे यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी त्यांचा कारभार संशयास्पद आहे. चौकशीची मागणी करूनही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे.
 कराड नगरपालिका येथे आरोग्य विभागामार्फत स्वच्छ संरक्षण कामांमध्ये बालकामगारांचा वापर होत असल्याचे पुरावे देऊनही ठेकेदारावर व संबंधित आरोग्य विभाग यांच्यावर कोणत्याही प्रकारची अद्याप कारवाई झालेली नाही. त्यांनाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न संबंधित अधिकारी करीत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड नगरपालिकेला विशेष रस्ता अनुदानामधून अकरा कोटी रुपये दिले होते. त्या कामात भ्रष्टाचार झाल्याबाबत अनेकदा तक्रारी देऊनही संबंधित अभियंता, उपअभियंता व ठेकेदार यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली दिसून येत नाही. प्रकरण गंभीर स्वरूपाचे असूनही नगरपालिकेत आपण दोघे भाऊ भाऊ जे मिळेल ते वाटून खाऊ असा प्रकार सुरू असल्याने त्याची चौकशी करण्यात यावी.
कराड नगरपालिकेचे माजी अभियंता एम. एच. पाटील यांच्या कार्यकाळात झालेल्या अकरा कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी. कारण ते नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत. तसेच सेवानिवृत्तीनंतर त्यांना मिळणारी पेन्शन, ग्रॅज्युटी फंड यापैकी काहीही देण्यात येऊ नये.
या बेमुदत प्राणांतिक उपोषनास संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला, संघटनेचे कराड तालुका अध्यक्ष सचिन भिसे तसेच मयत सतीश पांडुरंग भिसे यांच्या मातोश्री वय वर्ष 60 या बसलेल्या होत्या.
या आंदोलनाला संघटनेचे अध्यक्ष तथा माहिती अधिकार युवा राज्य फौंडेशनचे महारुद्र तिकुंडे, धर्मराज गायकवाड अध्यक्ष तंटामुक्ती खेड, लक्ष्मण कदम अध्यक्ष तंटामुक्ती बोरणे, नंदकुमार जावळे संचालक युवा राज्य फाउंडेशन, राजेंद्र यादव समाजसेवक, तुषार मोतलिंग जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी, कपिल राऊत समाजसेवक माहिती अधिकार, जाकिर पठाण कॉंग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष, एजाज पटेल दि कराड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संचालक, दीपक दाईंगडे उद्योजक या सर्वांनी पाठिंबा दिला होता.
इम्रान मुल्ला यांच्या बेमुदत उपोषणाची दखल घेत मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी मुल्ला यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक लेखी आश्‍वासन देत उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत इम्रान मुल्ला व सहकार्‍यांनी हे उपोषण स्थगित केले आहे.