धनगर समाज शेतीपूरक व्यवसायाकडे वळत असून अशा मुलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि बँकांची कर्जे कशी मिळतील यासाठी सातारा तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी माहिती राजमाता अहिल्यादेवी होळकर महोत्सव पठार सातारचे प्रमुख संजय शेडगे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली.
सातारा : आज सर्वच मुलांना शिक्षणाची कवाडे खुली झाली आहेत. मोफत शिक्षणाचा धनगर समाजातील मुलांनी लाभ घेणे गरजेचे आहे. धनगर समाज शेतीपूरक व्यवसायाकडे वळत असून अशा मुलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि बँकांची कर्जे कशी मिळतील यासाठी सातारा तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी माहिती राजमाता अहिल्यादेवी होळकर महोत्सव पठार सातारचे प्रमुख संजय शेडगे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली.
धनगर समाजासाठी परळी खोऱ्यात आयोजित दोन दिवसीय कार्यक्रमासाठी ते आज साताऱ्यात आले असता माध्यम प्रतिनिधींची बोलत होते. ते पुढे म्हणाले, सातारा तालुक्यातील दुर्गम डोंगरात धनगर समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतो. गेल्या काही वर्षांमध्ये शासनाने सर्वांसाठी मोफत शिक्षण केले असून धनगर समाजातील मुलांनी या शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे. उच्चशिक्षित झाले पाहिजे, ही काळाची गरज आहे. धनगर समाजातील मुलांना शाळेत जाण्यास प्रोत्साहन देण्यासाठी काही उपक्रम राबवता येतात का याची चाचपणी सुरू असून याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.
सातारा तालुक्यातील धनगर समाज आता केवळ मेंढपाळ राहिला नसून तो शेतीपूरक व्यवसायाकडे वळू लागला आहे. कोंबडी, म्हैस पालन यासारखे व्यवसाय त्यांनी अवलंबण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यांना म्हणावे तसे मार्गदर्शन मिळत नसल्याचे दिसून येते. शासनाच्या अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्या योजनांची सविस्तर माहिती देऊन त्यांचा लाभ कसा घ्यायचा? शेतीपूरक व्यवसायासाठी बँकेतून कर्ज कसे मिळवायचे याबाबत नजीकच्या काळात पठार भागात धनगर समाजातील मुलांसाठी मार्गदर्शक मेळावा घेऊन त्यामध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना माहिती देण्यात येणार आहे. अद्यापही शासनाकडून धनगर समाजाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यांना अद्यापही गावामध्ये प्रतिनिधित्व मिळत नाही, यावर या मेळाव्यात सांगोपांग चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.


