अंध, दिव्यांगांच्या उन्नतीसाठी डोळस व्यक्तींनी पुढे यावे
साताऱ्यातील दिव्यांग महोत्सवात खासदार श्रीनिवास पाटील यांचे प्रतिपादन
लोकांना हेवा वाटावा, असे कार्य दिव्यांगांच्या हातून होत आहे. या बांधवांनी आपल्या अंगभूत कलागुणांमुळे वेगळी उंची गाठली आहे. त्यांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. समाजातील डोळस व्यक्तींनीही यासाठी पुढे यावे, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
सातारा : लोकांना हेवा वाटावा, असे कार्य दिव्यांगांच्या हातून होत आहे. या बांधवांनी आपल्या अंगभूत कलागुणांमुळे वेगळी उंची गाठली आहे. त्यांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. समाजातील डोळस व्यक्तींनीही यासाठी पुढे यावे, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
सातारा पालिका व सातारा दिव्यांग समितीच्या संयुक्त विद्यमाने शाहू कला मंदिर येथे रविवारी ‘दिव्यांग महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात प्रतिभाशाली दिव्यांगांचा गौरव खा. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संयोजक गणेश दुबळे, नंदकुमार धनवडे, राहुल जाधव, अनिता धनवडे, दीपक वाळिंबे, गजानन भोसले, रोहिणी सत्रे, जैलानी इनामदार आदी उपस्थित होते.
प्रारंभी दिव्यांग बांधवांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून महोत्सवास प्रारंभ झाला. सकाळ सत्रात कोल्हापूर येथील ‘हेल्पर्स ऑफ हँडिकॅप’ ग्रुपने सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. लावणी, व्हीलचेअर डान्स, अंध व अपंग महासंघ यांचा ऑर्केस्ट्रा व त्यातील मराठी, हिंदी आणि देशभक्तीपर गीतांना नागरिकांनी भरभरून दाद दिली. वाईतील हणमंत कुडाळकर यांनी पारंपरिक गीते सादर केली.
दुपार सत्रात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिव्यांग परिषद पार पडली. या परिषदेत विविध १९ ठराव मंजूर करण्यात आले. यानंतर सायंकाळ सत्रात खा. श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते प्रतिभाशाली दिव्यांग ॲड. रणजितसिंह जगदाळे, लेखक, दिग्दर्शक जमीर आतार, दिव्यांग ऑलिम्पिकवीर ओंकार राने, विशेष शिक्षक अंध शहाबुद्दीन शेख, राष्ट्रीय खेळाडू प्रणव पवार यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी स्टॉलधारक, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी सर्वांना संयोजन समितीच्यावतीने प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी कल्याण राक्षे, प्रतिमा कदम, राजेंद्र पवार, नरेंद्र वानखेडे, उमेश खंडूझोडे, शंकर सकटे, सुधाकर भिलारे, वैशाली दुबळे, शिवाजी क्षीरसागर, अनिल कांबळे आदी उपस्थित होते.


