maharashtra

नववर्षाचे स्वागत घरी राहूनच करा

जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी केली नियमावली जाहीर

Welcome the New Year at home
ओमायक्रॉन चा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नववर्षाचे स्वागत घरातच साधेपणाने करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. नववर्ष स्वागताची नियमावली त्यांनी आदेशाद्वारे जाहीर केली.

सातारा : ओमायक्रॉन चा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नववर्षाचे स्वागत घरातच साधेपणाने करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. नववर्ष स्वागताची नियमावली त्यांनी आदेशाद्वारे जाहीर केली.
आदेशात जिल्हाधिकारी म्हणतात, जिल्ह्यात 25 डिसेंबर पासून रात्री नऊ ते सकाळी सहा या दरम्यान एकापेक्षा जास्त पाच व्यक्तीनी एकत्र येण्यास बंदी घातली आहे. 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी सातारकरांनी नव वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर न पडता घरातच साधेपणाने स्वागत करावे. आयोजित कार्यक्रम बंदिस्त सभागृहात एकूण क्षमतेच्या पन्नास, तर खुल्या जागेत एकूण जागेच्या पंचवीस टक्के उपस्थिती असावी. कोणत्याही ठिकाणी गर्दी न करता सामाईक अंतर राखणे, मास्क आणि सॅनीटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. कोरोना संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी साठ वर्षावरील प्रौढ आणि दहा वर्षाच्या आतील लहान मुलांनी बाहेर पडणे टाळावे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता कोरोना नियमांचे अनुपालन करावे.
महाबळेश्वर पाचगणी येथील पर्यटकांनी पर्यटन स्थळी गर्दी करू नये. नववर्षाच्या स्वागतासाठी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन न करणे तसेच मिरवणुका न काढणे बंधनकारक आहे. फटाक्यांची आतषबाजी करण्यास सक्त मनाई आहे. ही नियमावली सर्व शासकीय कार्यालयांना बंधनकारक राहणार आहे.