प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात महारुद्र तिकुंडे यांचा 26 जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा
विविध न्याय्य मागण्यांबाबत वेळोवेळी दिले होते प्रशासनाला निवेदन
आपण केलेल्या न्याय्य मागण्यांबाबत दिलेल्या निवेदनांसंदर्भात प्रशासनाने डोळेझाक केल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात 26 जानेवारी रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा माहिती अधिकार संस्थापक- अध्यक्ष, युवा राज्य फाऊंडेशन महाराष्ट्र चे महारुद्र तिकुंडे यांनी दिला आहे.
सातारा : आपण केलेल्या न्याय्य मागण्यांबाबत दिलेल्या निवेदनांसंदर्भात प्रशासनाने डोळेझाक केल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात 26 जानेवारी रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा माहिती अधिकार संस्थापक- अध्यक्ष, युवा राज्य फाऊंडेशन महाराष्ट्र चे महारुद्र तिकुंडे यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, महारुद्र तिकुंडे हे सातार्यातील समाजसेवक म्हणून ओळखले जातात. ज्याठिकाणी अन्याय वा बेकायदेशीर कृत्य दिसेल त्याला वाचा फोडण्याचे काम ते हिरीरीने समाजासाठी करीत असतात. त्याचाच भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत त्यांनी आवाज उठवला होता. त्यासंदर्भात सनदशीर मार्गाने प्रशासनाला वेळोवेळी निवेदनेही सादर केली होती. मात्र त्यांच्या निवेदनांची दखल न घेतल्यामुळे तिकुंडे यांनी आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
यासंदर्भात होती महारुद्र तिकुंडे यांची निवेदने-
1) सातारा येथील श्री.छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे नवीन इमारतीमध्ये स्थलांतर करण्याबाबत.
2) पाटबंधारे प्रकल्प, कृष्णानगर, सातारा कार्यालयाशेजारील, जि.प.शाळा कृष्णानगर या परिसरातील रस्त्याच्या निकृष्ट डांबरीकरणाबाबत.
3) सातारा जिल्ह्यातील कोतवालांच्या मानधनात वाढ.
4) गोडोली येथील हॉटेल लेक व्ह्यू व हॉटेल प्रिती मधील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असताना व त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येवूनही ही हॉटेल्स चालू ठेवून केलेल्या नियमभंगाबाबत.
5) मौजे खेड, ता. सातारा येथील खेड ग्रामपंचायतीने नगरपंचायत होण्यासाठी घेतलेल्या ठरावास हरकत.
6) मौजे बावडा, ता. खंडाळा येथील गट नं. 1073, 1074, 1075 या जागांवर औद्योगिक कारणांसाठी रेखांकन परवानगी मिळण्याबाबत केलेल्या अर्जावर हरकत व मंजूर झालेल्या रेखांकन, औद्योगिक बिनशेती आदेशाचा अंमल न होण्याबाबत.
7) सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्या अभ्यास दौर्यासाठी केलेल्या खर्चाची चौकशी करण्याबाबत.
8) फलटण नगरपरिषद, फलटण येथील मुख्याधिकारी वाय.बी. डांगे, नगर अभियंता एम.एच. पाटील, लिपीक बांधकाम विभाग, एस.बी. काळेबेरे यांनी संगनमताने आर्थिक तडजोड करुन शासनाची फसवणूक करुन बेकायदेशीर आर्किटेक्ट परवाना वितरित केल्याबाबत केलेल्या तक्रारी अर्जावर आदेश होवूनही कारवाई होत नसल्याबाबत.
9) विकास गोफणे, उपअधीक्षक, भूमि अभिलेख खंडाळा यांच्या मनमानी व बेकायदेशीर कारभाराबाबत चौकशी होवून योग्य ती कारवाई होण्याबाबत.
या निवेदनांवर कोणतीही प्रशासकीय कारवाई न झाल्याने तिकुंडे यांनी 26 जानेवारी 2022 रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.


