maharashtra

माकड धडकून रिक्षा पलटल्याने चालक ठार

सातारा-मेढा रस्त्यावरील अपघात

भरधाव वेगात असलेल्या रिक्षाच्या पुढील चाकाला माकड धडकल्याने रिक्षा पलटी झाली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सातारा : भरधाव वेगात असलेल्या रिक्षाच्या पुढील चाकाला माकड धडकल्याने रिक्षा पलटी झाली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सातारा मेढा रस्त्यावर झाला असून या दुर्दैवी अपघातात रिक्षा पलटी होऊन रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले.
संतोष नारायण जगताप वय 48, रा. ठोंबरेवाडी, ता. सातारा असे ठार झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली की, संतोष जगताप हे दिनांक 13 रोजी दुपारी दीड वाजता रिक्षा चालवत ठोंबरेवाडी इथून मेढ्याकडे जात होते. कन्हेर जवळील नदीच्या अलीकडे अचानक त्यांच्या रिक्षासमोर माकड आले. ते माकड रिक्षाच्या पुढील चाकाला धडकल्याने रिक्षा पलटली.
या अपघातात जगताप यांच्या डोक्याला आणि बरगड्यांसह मणक्याला गंभीर मार लागला. त्यांना तातडीने साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवार दिनांक 20 रोजी सायंकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून महिला पोलीस उपनिरीक्षक एस. एस. जाधव अधिक तपास करत आहेत.