ठोसेघरमध्ये अवतरले 'वाघोबा' ?
श्वानावर हल्ला ; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण, वन विभागाचे अस्ते कदम
ठोसेघर येथील माने वस्तीमध्ये आज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जंगली श्वापदाने एका श्वानावर जोरदार हल्ला चढवल्यामुळे त्यात ते श्वान जखमी झाले. गेल्या काही महिन्यांपासून ठोसेघर परिसरात एका वाघाचा वावर असल्याच्या जोरदार चर्चा घडत आहेत. त्यामुळे हा हल्ला वाघानेच केला असल्याची शक्यता व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा : गेल्या काही महिन्यांमध्ये ठोसेघर, ता. सातारा पठार विभागातील सांडवली येथे अस्वलाच्या हल्ल्यात एक नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच ठोसेघर येथील माने वस्तीमध्ये आज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जंगली श्वापदाने एका श्वानावर जोरदार हल्ला चढवल्यामुळे त्यात ते श्वान जखमी झाले. गेल्या काही महिन्यांपासून ठोसेघर परिसरात एका वाघाचा वावर असल्याच्या जोरदार चर्चा घडत आहेत. त्यामुळे हा हल्ला वाघानेच केला असल्याची शक्यता व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती सातारा येथील वन विभागाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिली असता त्यांनी या घटनेचे गांभीर्य न ओळखता उद्या रविवारी दि. ११ रोजी विभागाचे कर्मचारी पाठवून देतो, असे सांगत संबंधितांची बोळवण केली. वन विभागाच्या अस्ते कदमांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका तर निर्माण होणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, निसर्गरम्य वातावरण आणि धबधब्यामुळे पठार विभागात ठोसेघर या गावाचे नाव जगाच्या नकाशावर पोहचले आहे. भात, गहु ही दोनच पिके येथे प्रामुख्याने घेतली जातात. परिणामी अनेक नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्ताने मुंबई येथे स्थलांतरित झाले आहेत. या परिसरात बिबट्या, अस्वल, रानगवे, नाणगे, भेकर आदी जंगली श्वापदाचा मोठ्या प्रमाणावर वावर होत असल्यामुळे पिकांची फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. काही महिन्यापूर्वी हुबंरर्णे वस्ती परिसरात बिबट्याने काही श्वान गायब केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर शेतामध्ये चारा खात असणाऱ्या बैलांवर हल्ला केला होता. त्यानंतर काही महिन्यातच सांडवली, ता. सातारा येथे भल्या सकाळी एका अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला केला होता. त्यामध्ये त्याचा एक डोळा कायमचा जायबंदी झाला आहे. थोडक्यात ठोसेघर विभागात फार मोठ्या प्रमाणावर जंगली श्वापदांचा आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना जीव मुठीत घेऊन आपले आयुष्य जगावे लागत आहे.
ठोसेकर हे ठोसेघरसह मालदेव, हुबंरर्णे वस्ती, माने वस्ती अशा चार भागात विभागले आहे. या चारही विभागांना ठोसेघर ही एकमेव ग्रामपंचायत आहे.
मानेवस्ती येथे वास्तव्य करणारे शंकर रामचंद्र माने हे मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव करीत असतात. गणपतीसाठी ते ठोसेघर येथील मानेवस्ती येथे आले होते. त्यांच्या घरी एक पाळीव श्वान आहे. आज शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हे श्वान माने यांच्या घराशेजारी असलेल्या ओढ्यानजीक गेले असता त्याच्यावर एका जंगली श्वापदाने जोरदार हल्ला चढवला. श्वान जोरदार किचंळल्यामुळे गावकऱ्यांनी काट्या, बॅटऱ्या घेऊन ओढ्याकडे धाव घेतली. त्यामुळे ते जंगली श्वापदाने श्वानाला जखमी अवस्थेत तेथेच टाकून पलायन केले. स्थानिक नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आरडाओरडा केली. गावकऱ्यांनी जखमी झालेल्या श्वानाला तात्काळ मालकाच्या घरी आणून त्याच्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर याबाबतची माहिती मानेवस्ती येथील एका युवकाने सातारा येथील वनविभागाच्या कार्यालयाला दिली. मात्र संबंधित अधिकाऱ्याने उद्या रविवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी कर्मचाऱ्यांना पाठवून देतो असे सांगत घाबरलेल्या ग्रामस्थांची बोळवण केली. त्यामुळे नागरिकांनी रात्र वैऱ्याची आहे असे म्हणत रात्रभर जागणे पसंत केले.


