maharashtra

डॉ. बाबासाहेबांच्या शाळेत संविधान दिन साजरा

प्रतापसिंह हायस्कूलमध्ये विविध उपक्रम : विद्यार्थ्यांना शिकवली संविधानाची तत्वे

Constitution Day celebrated at Dr. Babasaheb's school
ज्या श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्या शाळेतील शिक्षकांनी तसेच दलित शक्ती केंद्र संर्स्थेतर्फे विविध उपक्रमांच्या माध्यमातून संविधान दिन साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांच्या मनात संविधानाची स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही तत्वे रुजावित यासाठी माहितीपत्रकाच्या माध्यमातून संविधानाची माहितीही देण्यात आली.

सातारा : ज्या श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्या शाळेतील शिक्षकांनी तसेच दलित शक्ती केंद्र संर्स्थेतर्फे विविध उपक्रमांच्या माध्यमातून संविधान दिन साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांच्या मनात संविधानाची स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही तत्वे रुजावित यासाठी माहितीपत्रकाच्या माध्यमातून संविधानाची माहितीही देण्यात आली.
हायस्कूलचे उपमुख्याध्यापक कांबळे, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या व दलित शक्ती केंद्र संस्थेच्या सलमा मोरे तसेच ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके यांच्या उपस्थित संविधान दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संविधान म्हणजे नेमके हे विद्यार्थ्यांना हसत खेळत समजून घेता यावे व त्यांना आतापासून स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय याचे महत्व कळावे यासाठी नवीनवीन प्रयोगांच्या माध्यमातून सलमा मोरे यांनी माहिती दिली.
यावेळी बोलताना उपमुख्याध्यापक कांबळे म्हणाले, प्रतापसिंह हायस्कूलला मोठी गौरवशाली परंपरा आहे. ज्यांनी देशाला संविधान दिले व ज्यांचे पुतळे जगभरातील इतर देशात देखील सन्मानाने उभे आहेत त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण या शाळेत झाले. तद्वतच न्यायमूर्ती गजेंद्रगडकर, उद्योगपती धनजीशा कूपर, विमा कंपनीचे संस्थापक अण्णासाहेब चिरमुले अशी अनेक रत्ने या शाळेतून शिकूनच मोठी झालेली आहेत. संविधान दिनानिमित्ताने या हायस्कूला वेगळे महत्व आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही गौरवशाही परंपरा कळावी यासाठी हा दिन साजरा करुन संविधानाचे महत्व जगण्याच्या वाटचालीत किती महत्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना समजावून देण्याचा प्रयत्न करत हा दिन साजरा करण्यात आला आहे.
ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके म्हणाले, संविधानावर देशाचा कारभार सुरु असून संविधानाची ओळख विद्यार्थीदशेतच झाल्यास खऱया अर्थाने सुजाण नागरिक या विद्यार्थ्यांमधून निर्माण होतील. अशा सुजाण नागरिकांकडूनच देशासाठी चांगले काम होईल. या हेतूने प्रतापसिंह हायस्कूलने राबवलेला हा उपक्रम निश्चितपणे चांगल्या सामाजिक वाटचालीसाठी कौतुकास्पद आहे.
यावेळी सलमा मोरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून संविधान म्हणजे नेमके काय यासाठी दलित शक्ती केंद्रातर्फे कागदांच्या माध्यमातून निर्मित करण्यात आलेल्या साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख करुन दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी देखील त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत संविधानातील मूलभूत तत्वे हसत खेळत समजून घेतली.