maharashtra

20 किंवा 21 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, मलाही मंत्रिपद मिळणार : बच्चू कडू


Cabinet may be expanded on 20th or 21st, I too will get ministership: Bachu Kadu
अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. 20 ते 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं बच्चू कडू म्हणाले.

एकीकडे काल (11 मे) महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल लागला आणि दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्ताराची (Maharashtra Cabinet Expansion) चर्चा सुरु झाली आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. 20 ते 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं बच्चू कडू म्हणाले. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे, त्यामुळे मलाही मंत्रिपद मिळणार, असा दावाही बच्चू कडू यांनी केा. ते एबीपी माझाशी अमरावती (Amravati) इथे बोलत होते.

'एकनाथ शिंदेंनी यशस्वी लढा जिंकला'
एकनाथ शिंदे यांच्या बहुमत होतं. त्यांनी कागदोपत्री यशस्वी लढा जिंकला. व्यवस्थित नियोजन केलं. त्यांना सगळ्यांचं पाठबळ आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निकालवर दिली आहे. 

'आता विस्तार झाली नाही तर मग 2024 नंतरच होईल'
बच्चू कडू पुढे म्हणाले की, "आता मंत्रिमंडळ विस्ताराला कोणतीही अडचण नसावी. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे. लोकांची कामे निकाली निघावीत यासाठी लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे. माझ्या कानावर आलंय की 20 किंवा 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि गरजेचं पण आहे. आमच्यासाठी नाही तर जनतेसाठी फार महत्त्वाचं आहे. एकेका मंत्र्याला पाच ते सहा पालकमंत्रिपद आणि तर खाती दिल्याने लोकांची म्हणावी तशी कामं होत नाहीत. कोणाला मंत्री बनवतात हा नंतरचा भाग पण विस्तार होणं महत्त्वाचं आहे. आता विस्तार झाला नाही तर मग 2024 नंतरच विस्तार होईल असं मला वाटतं."

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शब्द पाळतील : बच्चू कडू
तुम्हा मंत्रिपद मिळणार का, याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं का, असं विचारलं असता बच्चू कडू म्हणाले की, "मी मुख्यमंत्र्यांना बोललो नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे, त्यामुळे ते आपला शब्द पूर्ण करतील."

महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू यांच्याकडे राज्यमंत्रीपद होतं. परंतु शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार एकदाच झाला. त्यामुळे पहिल्या विस्तारामध्ये स्थान न मिळालेल्या अनेकांना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे. अनेकांना मंत्रिपदाची आस आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार 20 ते 21 तारखेला होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.