माण-खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल येथे उपचार सुरु आहे. गोरे यांच्यासह 4 जण त्या गाडीतून प्रवास करत होते.
पुणे : माण-खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल येथे उपचार सुरु आहे. गोरे यांच्यासह 4 जण त्या गाडीतून प्रवास करत होते.
या अपघातात गोरे यांच्यासह त्याचे सहकारी किरकोळ जखमी झाले आहेत, तर त्यांचे चालक आणि अंगरक्षकाला गंभीर दुखापत झाली आहे.
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचे वडिल भगवान गोरे यांनी या अपघाताबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 'हा घातपात असू शकतो,' अशी शंका भगवान गोरे यांनी व्यक्त केली आहे. भगवान गोरे यांनी सकाळी जयकुमार गोरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
"सकाळी मला फलटण येथून फोन आला. गाडीत काय झाले असेल हे मला माहित नाही. अपघात झाला तेव्हा या पुलावर वाहतुक नव्हती. त्यामुळे मला शंका वाटते. अपघात झाला त्या ठिकाणी मी गेलो होतो, त्याठिकाणी अपघात होण्यासारखे काही नाही, पुलाचा कठडा तोडून गाडी गेली कशी ? त्यामुळे घातपाताची शंका आहे. हे फलटणमध्येच घडतंय म्हणून मला शंका आहे. पण माझा कुणावरही संशय नाही," असे भगवान गोरे यांनी पत्रकारांना सांगितले
आमदार गोरे यांच्या छातीला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुबी हॉल रुग्णालयातील न्युरो ड्रॉमा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. कपिल गंगाधर झिरपे यांनी दिली आहे.
काल (शुक्रवारी) अधिवेशनाचे दिवसभराचे कामकाज संपल्यानंतर आमदार गोरे विमानाने नागपूरहून पुण्याला आले. रात्री त्यांच्या गाडीने फलटण मार्गे दहिवाडीकडे निघाले होते. पहाटेच्या 3.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा गाडीला अपघात झाला. बाणगंगा नदीवरील पूल अरुंद आहे, या पुलाचा अंदाज न आल्याने भरधाव गाडी यापुलावरून 50 फूट खाली कोसळली.


