अखिल भारतीय नाट्य परिषेदवर राजेश कुंभारदरे बिनविरोध
खा. उदयनराजे भोसले, विनोद कुलकर्णी व पंकज चव्हाण यांचा पुढाकार
अखिल भारतीय नाट्य परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीसाठी सातारा जिल्हयातून निवडून जाणा-या एका जागेची निवडणूक खा. श्री. उदयनराजे भोसले यांच्या आदेशामुळे टळली आहे.
सातारा : अखिल भारतीय नाट्य परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीसाठी सातारा जिल्हयातून निवडून जाणा-या एका जागेची निवडणूक खा. श्री. उदयनराजे भोसले यांच्या आदेशामुळे टळली आहे. उदयनराजेंनी घेतलेल्या निर्णयामुळे महाबळेश्वर येथील राजेश कुंभारदरे नाट्यपरिषदेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. राजेश कुंभारदरे यांची निवड झाल्यानंतर महाबळेश्वर येथील नाटय परिषदेच्या शाखेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी जलमंदिर येथे उदयनराजेंची यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
अखिल भारतीय नाटय परिषदेची निवडणूक सध्या सुरु आहे. सातारा जिल्हयाच्या वाट्याला एक जागा आली आहे. या जागेसाठी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एक अर्ज अवैध ठरला होता. तीऩ अर्ज शिल्लक राहिले होते. त्यामध्ये महाबळेश्वरमधील दोन अर्ज होते आणि साता-यातील एक अर्ज होता. महाबळेश्वरमधून माजी नगराध्यक्ष डी.एम.बावळेकर यांनी उदयनराजेंच्या आदेशामुळे माघार घेऊन राजेश कुंभारदरे यांना पाठिंबा दिला. शिरीष चिटणीस आणि राजेश कुंभारदरे यांच्यात निवडणूक होईल असे वातावरण तयार झाले होते. मात्र मसाप, सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी आणि पंकज चव्हाण यांनी मध्यस्थी करुन याप्रकरणी समेट घडवला. यावर्षी महाबळेश्वर तालुक्याला प्रतिनिधीत्व देऊया आणि सातारा जिल्हयातून बिनविरोध निवडीचा पायंडा पाडूया, अशी विनंती त्यांनी दोन्ही उमेदवारांना केली. विनोद कुलकर्णी यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन शिरीष चिटणीस आणि उदयनराजे यांच्यात चर्चा झाली. शिरीष चिटणीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत विनोद कुलकर्णी यांची विनंती मान्य केली आणि उदयनराजेंना यांना तुमच्या सूचनेनुसार मी माघार घेतो. महाबळेश्वरला या पंचवार्षिकला संधी देऊया अशी भूमिका घेतली. या सर्व घडामोडीत महाबळेश्वर येथील पत्रकार विलास काळे, अभिजित खुरासणे, संजय दस्तुरे यांनीही महत्वाची भूमिका बजावली. भविष्यात महाबळेश्वरला नाट्यसंमेलन घ्यायचे असल्यामुळे उदनयराजे यांनी शिरीष चिटणीस यांना अर्ज माघारी घ्यायच्या सूचना केल्या आणि महाबळेश्वरच्या प्रतिनिधींची बिनविरोध निवड झाली. उदयनराजेंच्या भूमिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात सातारा जिल्हा एकसंघ असल्याचा संदेश गेला. नाटयक्षेत्रात कोणीही कोणते राजकारण करु नये, नाटयचळवळ वाढली पाहिजे, यासाठी सातारा जिल्हयातील सर्व कार्यकर्त्यांसाठी एकोपा हवा आहे. सातारा जिल्हयाचे प्रतिनिधीत्व एकसंघपणे महाराष्ट्रापुढे गेले पाहिजे अशी भूमिका मी स्वतः मांडली आणि त्याला सगळ्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होऊ शकली. बिनविरोध निवडीचा निश्चितपणे सातारा जिल्हयाला फायदा होईल, अशी प्रतिक्रिया खा. उदयनराजे यांनी दिली.


