वादळी वार्यासह माण-म्हसवडच्या बहुतांश भागात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या जोरदार विजेच्या कडकडाटात हिंगणी, ता. माण येथील शुभम सरतापे या 23 वर्षीय युवकाला तसेच गोठ्यातील म्हैशीला विजेचा शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
म्हसवड : वादळी वार्यासह माण-म्हसवडच्या बहुतांश भागात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या जोरदार विजेच्या कडकडाटात हिंगणी, ता. माण येथील शुभम सरतापे या 23 वर्षीय युवकाला तसेच गोठ्यातील म्हैशीला विजेचा शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, हिंगणी, ता. माण येथील लालासो दाजी सरतापे, पत्नी, सौरभ व शुभम या त्यांच्या मुलांसह एकत्र राहत होते. रात्री 10 च्या दरम्यान विजांचा कडकडाट व पावसाची धार सुरु होती. यावेळी जनावरांचे पत्र्याचे शेड असलेल्या गोठ्यातुन जनावरे ओरडत असल्याचा आवाज आला. यावेळी शुभम हा जनावरे का ओरडतात म्हणून पहायला गेला. त्याचवेळी घराच्या मागील बाजूस असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर (डिपीवर) विज पडल्याने पत्र्याच्या गोठ्याला विज प्रवाह लागत होता. त्यामुळे जनावरे दावी तोडून गोठ्यातून बाहेर पडली होती. मात्र म्हैसीचे दावे जाड असल्याने ते तुटत नव्हते. म्हैसीला विजेचा शॉक लागत असल्याने ती जोरजोरात ओरडत होती. शुभमने तिच्या जवळ जाताना पत्र्याच्या शेडच्या लोखंडी अँँगलला धरले. त्यावेळी ज्याला जोरदार विजेचा शॉक लागुन तो खाली पडला. त्याचवेळी म्हैशीचाही या विजेच्या शॉकने मृत्यू झाला.
दहा मिनिटे झाली तरी गोठ्यात गेलेला शुभम येईना म्हणून वडील पावसात टॉर्च घेऊन पहावयास गेले असता शुभम खाली पडला होता, तर शेजारी म्हैसही पडलेली दिसली. शुभमला हाका मारल्या असता तो उठत नसल्याने घरात एकच हंबरडा फुटला. ट्रान्सफॉर्मरवर विज पडल्याने शॉर्ट सर्किट होऊन विज प्रवाह पत्र्यावर आल्याने शुभमचा मृत्यू झाला. रात्री पाऊस पडत असल्याने व लाईट नसल्याने म्हसवड पोलिसांत तक्रार देण्यास अडचण निर्माण झाली होती. दुसर्या दिवशी सकाळी शुभमचे वडिल लालासो दाजी सरतापे यांनी म्हसवड पोलिसात वीज ट्रान्सफॉर्मरवर पडल्याने मृत्यू झाल्याची तक्रार दाखल केली. उत्तरीय तपासणीनंतर हिंगणी या त्याच्या गावी शुभमवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद म्हसवड पोलिसात झाली असून देवानंद खाडे अधिक तपास करीत आहेत.


