एक कोटी आठ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद करण्यात सातारा आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
सातारा : एक कोटी आठ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद करण्यात सातारा आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वैदेही मल्टीस्टेट ऍग्रो को-ऑपरेटिव्ह सोसायटी, साखरवाडी, ता. फलटण येथील कंपनीत चेअरमन, संचालक व इतर यांनी सामान्य जनतेला आर्थिक लाभाचे आमिष दाखवून त्यांना कंपनीच्या विविध प्लॅनमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून सामान्य जनतेची आर्थिक फसवणूक केल्याबाबत 29 जून 2022 रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा अधिक तपास सातारा आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आज अखेर एक कोटी आठ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील सोमनाथ खंडू नेहे रा. पाथर्डी फाटा, नाशिक आणि ज्ञानेश्वर तुकाराम गाढवे रा. बोपर्डी, ता. वाई यांचा मागील आठ महिन्यांपासून पोलीस शोध घेत असताना ते सापडत नव्हते. यातील ज्ञानेश्वर गाढवे यास दिनांक 6 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. मात्र सोमनाथ नेहे हा सापडत नव्हता. त्याला अटक करण्यासाठी पथकही तैनात करण्यात आले होते. त्यानुसार सोमनाथ नेहे हा 17 फेब्रुवारी रोजी पुणे येथे येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक जाधव यांना मिळाली. त्यानंतर केलेल्या तांत्रिक विश्लेषनाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी सापळा लावून पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी सोमनाथ नेहे यास जेरबंद केले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. त्याच्यावर एकूण 37 गुन्हे नाशिक येथे दाखल आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक मोहन शिंदे यांच्या अधिपत्याखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे पोलीस हवालदार प्रशांत ताटे पोलीस नाईक मनोज जाधव संजय मोरे चालक संतोष राऊत यांनी सहभाग घेतला.


