maharashtra

शताब्दी महोत्सवाच्या सांगता समारोहाला कवयित्री अरुणा ढेरे यांची उपस्थिती

कन्या शाळेचे संचालक दत्ताजी थोरात व मुख्याध्यापिका सुरेखा दौंडे यांची माहिती

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या येथील कन्या शाळेच्या शताब्दी वर्षाचा सांगता समारोह येत्या 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता होत आहे. या समारोहास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवयित्री समीक्षक लेखिका अरुणा ढेरे उपस्थित राहणार असल्याची माहिती कन्या शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष दत्ताजी थोरात व मुख्याध्यापिका सुरेखा दौंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सातारा : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या येथील कन्या शाळेच्या शताब्दी वर्षाचा सांगता समारोह येत्या 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता होत आहे. या समारोहास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवयित्री समीक्षक लेखिका अरुणा ढेरे उपस्थित राहणार असल्याची माहिती कन्या शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष दत्ताजी थोरात व मुख्याध्यापिका सुरेखा दौंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बीसीए कॉलेजच्या प्राचार्या व संस्थेच्या आजन्मसेविका डॉक्टर समीक्षा निकम व शाळा समितीच्या सदस्या मधुरा काळे उपस्थित होत्या.
दत्ताजी थोरात पुढे म्हणाले, 24 नोव्हेंबर रोजी क्न्या शाळेच्या शताब्दी वर्षाची सांगता होत आहे. सकाळी 11 वाजता सांगता समारोहाच्या प्रमुख पाहुण्या समीक्षाकार जेष्ठ साहित्यिक कवयित्री डॉक्टर अरुणाताई ढेरे उपस्थित राहणार आहेत. उपस्थित विद्यार्थिनींना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे. यावेळी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत.
शाळेच्या प्राचार्या सुरेखा दौंडे बोलताना पुढे म्हणाल्या, शंभर वर्षांपूर्वी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रयत्नाने येथील दादासाहेब करंदीकर यांच्या वाड्यात कन्या शाळा सुरू झाली. 1 नोव्हेंबर 1922 रोजी या शाळेत सात विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला होता. त्यानंतर वकील कैलासवासी राव बहादूर रावजी रामचंद्र काळे यांच्या वाड्यात शाळा स्थलांतरित झाली. काळे यांनी स्वतःचा राहता वाडा पत्नी सौ सत्यभामाबाई काळे यांच्या निधनानंतर कन्या शाळेस भेट म्हणून दिला. शिक्षणाच्या कार्याचा विस्तार व्हावा हा त्यामागचा उदात्त हेतू होता. तेव्हापासून गेल्या शंभर वर्षांमध्ये येथून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या अनेक विद्यार्थिनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नामवंत ठिकाणी उज्वल कामगिरी करत संस्थेचे नाव मोठे करीत आहेत. 1922 साली सुरू झालेल्या शाळेची वाटचाल रौप्य, सुवर्ण, हीरक, अमृत, नवती अशा विविध टप्प्यानंतर आता शताब्दी महोत्सवापर्यंत झाली आहे. या शताब्दी महोत्सवानिमित्त येत्या गुरुवारी विविध कार्यक्रम करण्यात येत असून शाळेने आत्तापर्यंत वर्षभरात विविध उपक्रम राबवले. पोवई नाका ते कन्या शाळा क्रीडा ज्योत, 101 पणत्यांनी प्रकाशमान केलेला कन्याशाळेचा परिसर, चित्र शिल्प, गायन कला मेळावा, कृतज्ञता मेळावा, कायदेशीर सल्ला मार्गदर्शनपर व्याख्यान, डॉक्टर एस रंगनाथन जयंतीनिमित्त स्पर्धा व ग्रंथपालांचा सन्मान, महर्षी कर्वे मॅरेथॉन स्पर्धा आंतरशालेय देशभक्तीपर समूहगीत गायन, महर्षी कर्वे कबड्डी चषक स्पर्धा, माजी विद्यार्थिनींचा महामेळावा, थोर सामाजिक कार्यकर्त्या जोस्ना कोल्हटकर, उद्योजिका शैलजा काटदरे, टॅक्स कन्सल्टंट अरुण गोडबोले यांच्या प्रकट मुलाखती अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे नियोजन यशस्वीरित्या केले जाणार आहे. या सांगता समारोहाचा सर्व साताऱ्यातील सन्माननीय प्रतिष्ठित दानशूर व्यक्तींनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य सुरेखा दौंडे यांनी केले आहे.