maharashtra

सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा


पोलिस दलाने गेल्या आठवड्यात गुटखा विक्रेत्यांची पोलखोल करण्यास सुरुवात केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने अंग झटकत सातारा येथील राजवाडा परिसरात कारवाई केली.

सातारा : पोलिस दलाने गेल्या आठवड्यात गुटखा विक्रेत्यांची पोलखोल करण्यास सुरुवात केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने अंग झटकत सातारा येथील राजवाडा परिसरात कारवाई केली. 909 रुपयांचा गुटखा जप्त करत असताना एका संशयिताने अन्न प्रशासनाच्या अधिकार्यांना शिवीगाळ, दमदाटी पळ काढला. दरम्यान, राजवाड्यावरील या थरारक प्रसंगाने सारे अवाक् झाले.
शाहीद राजेमोहम्मद बागवान (वय 36, रा. यादोगोपाळ पेठ) व शिवा बाळू अहिवळे (वय 33, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी इम्रान शमीर हवालदार (वय 45, रासदरबझार) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून ते अन्न सुरक्षा अधिकारी आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 14 रोजी भरदुपारी घडली आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी पोलिस दलाच्यावतीने अवैध गुटखा विक्रेत्यांचा पर्दाफाश करण्यात आला. सोमवारी अशा विक्रेत्यांवर ज्या शासकीय यंत्रणेचे कंट्रोलिंग आहे तो अन्न विभाग कारवाई करण्यासाठी राजवाडा परिसरात गेला. विविध प्रकारचा मिळून अवघ्या 909 रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर मात्र अन्न विभागातील पथकाला दोन्ही संशयित आवरले नाहीत. त्यातील एका संशयिताने शिवीगाळ, दमदाटी करत पळ काढला.
हातातील संशयित पळून गेल्यानंतर अन्न विभागाची तारांबळ उडाली. अन्नच्या वरिष्ठांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार सोमवारी रात्री उशीरा शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.