ढगाळ वातावरण, बोचरी हवा आणि पावसाच्या रिपरिप सरी अशा विचित्र वातावरणाचा अनुभव सातारकर घेत आहेत. बुधवारी सकाळपासून जोरदार पावसाने सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागाला झोडपले. अचानक आलेल्या पावसाने सातारकरांच्या कामाचा खोळंबा तर झालाच, शिवाय प्रकृतीच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे.
सातारा : ढगाळ वातावरण, बोचरी हवा आणि पावसाच्या रिपरिप सरी अशा विचित्र वातावरणाचा अनुभव सातारकर घेत आहेत. बुधवारी सकाळपासून जोरदार पावसाने सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागाला झोडपले. अचानक आलेल्या पावसाने सातारकरांच्या कामाचा खोळंबा तर झालाच, शिवाय प्रकृतीच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे.
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार अरबी समुद्रात सातत्याने कमी दाबाचे क्षेत्र असून पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे. समुद्रातील चक्रीय वातामुळे वाऱ्याचा जोर जमिनीच्या दिशेने जास्त असल्याने पश्चिम महाराष्ट्रावर दाट ढग असून त्यामुळे येत्या 48 तासात मुसळधार वृष्टीचा इशारा दिला होता. या हवामानाचा प्रभाव येत्या तीन डिसेंबरपर्यंत राहणार असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.
सातारा शहरात गेल्या आठवडाभरापासून ढगाळ सदृश वातावरण होते. मात्र बुधवारी सकाळपासूनच साताऱ्यात उघडीप घेणारी पावसाची रिपरिप सुरु होती. ऐन डिसेंबरमध्ये सातारकरांना छत्री घेऊन बाहेर पडावे लागत आहे. याशिवाय डोके दुखणे, कफ जमा होणे, खोकला अशा तब्ब्येतीच्या तक्रारी सातारकरां च्या सुरु झाल्याने त्यांना डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या नंतर सातारा शहरात अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. साताऱ्यात पावसाने वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य झाले. अगदी शाहू चौकात उतार असूनही घोट्या एवढे पाणी साचले होते. सातारा, कराड, पाटण आणि महाबळेश्वर तसेच सातारा ते कराड या दरम्यान असणाऱ्या महामार्ग परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक खूपच मंदावली होती. या पावसाने रब्बी हंगामाला जोरदार फटका दिला असून बळीराजाच्या चिंता वाढल्या आहेत.


