शाहू कला मंदिराचे उदयनराजे यांच्या हस्ते शानदार लोकार्पण
घाशीराम कोतवाल नाटकाचा रसिकांनी घेतला आनंद
अद्ययावत सुविधांनी युक्त आणि रंगकर्मीचे हक्काचे व्यासपीठ असणारे शाहू कला मंदिर दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर रसिकांसाठी खुले झाले. येथील सुविधांसह नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सातारा : अद्ययावत सुविधांनी युक्त आणि रंगकर्मीचे हक्काचे व्यासपीठ असणारे शाहू कला मंदिर दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर रसिकांसाठी खुले झाले. येथील सुविधांसह नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी अण्णा नाईक फेम प्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर, सरु आज्जी फेम रुक्मिणी सुतार, ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अँड दत्ता बनकर, नगरसेवक वसंत लेवे, निशांत पाटील, पंकज चव्हाण, इ यावेळी उपस्थित होते.
तब्बल एक कोटी ऐंशी लाख रुपये खर्च करून स्टेज मॅटिंग, वातानुकुलन यंत्रणा, ध्वनीयंत्रणा, रंगमंचावरील बहुपेडी नेपथ्य रचना, प्रकाश संयोजन, मेकअप रूम, आकर्षक भित्तीचित्रे आणि प्रवेशदाराची सजावट इ सोयी शाहू कला मंदिरामध्ये उपलब्ध झाल्या आहेत. या सर्व सुविधांची पाहणी खासदार उदयनराजे यांनी केली. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने झाली. शाहू कला मंदिराच्या दर्शनी भागातील स्व. प्रतापसिंह महाराज भोसले यांच्या तैलचित्राचे अनावरण उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले. घाशीराम कोतवाल नाटकाच्या चमूपैकी अण्णा नाईक फेम अभिनेते माधव अभ्यंकर व रुक्मिणी सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
खासदार उदयनराजे भोसले यांनी शाहू कला मंदिराच्या अद्ययावत सुविधांचे यांनी कौतुक केले. सातारा विकास आघाडीने आपल्या वचननाम्यात जी कामे दिली ती जवळपास पूर्ण झाली आहेत. शाहू कला मंदिर ही रंगकर्मी साठी ही मोठी भेट आहे. यापुढे उत्तमोत्तम नाटके रसिकांसाठी उपलब्ध होतील, अशी ठाम ग्वाही उदयनराजे भोसले यांनी बोलताना दिली. लोकार्पण सोहळ्यानेतर घाशीराम कोतवाल या नाटकाचा विनामूल्य रंगलेल्या नाट्य प्रयोगाचा आस्वाद सातारकर रसिक प्रेक्षकांनी घेतला.


