बारामती व फलटण तालुक्याला एकत्रित जोडणारा नीरा नदीवरील पूल सोमेश्वर मंदिरानजिक होणार असल्याने त्याची पाहणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली व या पुलाला निधी देणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
सातारा : बारामती व फलटण तालुक्याला एकत्रित जोडणारा नीरा नदीवरील पूल सोमेश्वर मंदिरानजिक होणार असल्याने त्याची पाहणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली व या पुलाला निधी देणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
फलटण पूर्व भागातील जनतेला बारामतीकडे जाण्यासाठी नीरा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्यावरून जावे लागते. कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्यातून जात असताना हातात जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत असल्याने या नदीवर पुलाची गरज आहे, हे ओळखून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी या भागातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विशाल सिंह माने-पाटील, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनंजय पवार, भाजपा उपाध्यक्ष नितीन गोडसे पाटील यांच्या समवेत पाहणी केली.
नीरा नदीवरील आसू-सोनगाव या मार्गे पूल होणार असल्याचे प्रतिपादनही खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले. त्यांनी आज प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. पुलालाही प्रशासकीय मान्यता लवकरच मिळवून देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या पुलाबाबत संबंधित विभागाला लवकरच सर्व्हे करण्यासाठी आपण सांगणार असून या भागातील विकासासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचेही आवर्जून त्यांनी सांगितले.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे या भागाचे भारतीय जनता पार्टीचे विशाल सिंह माने-पाटील यांनी याबाबत अनेक वेळा मागणी केली होती. आज स्वतः खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पाहणी केल्याने अखेर या पुलाचा प्रश्न मार्गी लागणार असून त्यामुळे बारामती ला जाणे अधिक सुखकर होईल.
यावेळी विशालसिंह माने-पाटील म्हणाले, आसू-सोनगाव मार्गे जर पूल झाला तर बारामतीला जाण्याचा जवळचा व अतिशय सोपा मार्ग या पुलाच्या माध्यमातून होणार असल्याने फलटण पूर्व भागातील जनतेला याचा फायदा होईल. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या पुलाबाबत स्वतः लक्ष घातले असून लवकरच पुलाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही माने यांनी यावेळी सांगितले.


