अशोकराव भावके यांना ठोकर देऊन पसार झालेल्या कारचालकास अटक
कराड ग्रामीण पोलिसांची कामगिरी : पुण्यातून संशयीताला कारसह घेतले ताब्यात
शिवसेनेचे नेते अशोकराव भावके यांना ठोकर देऊन पसार झालेल्या कारचालकाला कराड ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी १७ रोजी रात्री उशिरा पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले. या घटनेतील होंडा सिटी कारही पोलिसांनी (एमएच- 02 - बीपी- 6687) जप्त केली आहे.
कराड : शिवसेनेचे नेते अशोकराव भावके यांना ठोकर देऊन पसार झालेल्या कारचालकाला कराड ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी १७ रोजी रात्री उशिरा पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले. या घटनेतील होंडा सिटी कारही पोलिसांनी (एमएच- 02 - बीपी- 6687) जप्त केली आहे.
किरण महेंद्र महादे (वय 28) रा.शांतीनगर, येरवडा (पुणे) असे याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड-रत्नागिरी महामार्गावर घोगाव येथे मंगळवारी १५ रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घोगाव ता. कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्था व मातोश्री सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अशोकराव भावके यांना एका अज्ञात कारने धडक दिल्याची घटना घडली होती. या अपघातात भावके यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर अज्ञात कार चालकाने कारसह घटनास्थळावरून पलायन केले होते. या अपघाताची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली होती. दरम्यान, अशोकराव भावके यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील,पोलिस निरिक्षक आनंदराव खोबरे यांनी सखोल तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार सहायक पोलिस निरिक्षक सखाराम बिराजदार, फौजदार भरत पाटील, हवालदार संदिप कांबळे, गुन्हे प्रकटीकरणचे सज्जन जगताप यांनी गुन्ह्याचा तपास केला.
त्यामध्ये पोलिसांना घटनास्थळी कारचा तुटलेला आरसा व कारचा मरुम लाल रंगाचा तुटलेला भागावरुन पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता त्यामध्ये एक कर त्या भागातून सुसाट गेल्याचे दिसून आले. त्यांनतर पोलिसांनी सदर कारचा नंबर प्राप्त करून ती कार शोधून काढली. होंडा सिटी कंपनीची ही कार असून त्यावरून पोलिसांनी कार चालकाचा शोध लावला.
त्यानंतर सहायक पो.नि. बिराजदार, ह. कांबळे व जगताप यांनी पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पळून गेलेल्या कारचालक किरण महादे याला ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी शांतीनगर, पुणे येथे गॅरेजवर दुरुस्तीला लावलेली होंडा सिटी कारही जप्त केली.
पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक सखाराम बिराजदार, फौजदार भरत पाटील,हवालदार संदिप कांबळे, गुन्हे प्रकटीकरणचे सज्जन जगताप यांनी या तपासात सहभाग घेतला.


